महिला बचतगटांची बँक स्थापन करणार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:45 PM2020-10-03T15:45:28+5:302020-10-03T15:45:53+5:30
राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महिला बचत गटांची चळवळ ही नुसती सरकारी काम, अभियान राबविण्यासाठी नसून त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचे हे काम लोकचळवळ म्हणून उभारूया, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महिला बचत गटांची चळवळ ही नुसती सरकारी काम, अभियान राबविण्यासाठी नसून त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचे हे काम लोकचळवळ म्हणून उभारूया, असेही त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामविकास विभागांतर्गत उमेद संस्थेच्यावतीने शुक्रवारी आयोजित ऑनलाईन महिला मेळाव्यात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महात्मा गांधींनी मांडलेले ग्रामविकासाचे विचार सर्वांनाच अनुकरणीय आहेत. जोपर्यंत गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत विकास ही संकल्पनाच अपुरी असेल.
गावाने खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर आधी महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे. बचत गटांच्या माध्यमातून राज्य सरकार दरवर्षी ७७०० कोटी खर्च करत आहे. यातून ५० लाखांहून अधिक कुटुंबे जोडली आहेत. या कुटुंबांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी स्वतंत्र बँक स्थापन करणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी स्वागत केले. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अतिरिक्त संचालिका श्रीमती मानसी बोरकर यांनी आभार मानले.