प्रभागात विकेंद्रित घनकचरा केंद्रे उभी करा
By admin | Published: March 14, 2016 12:40 AM2016-03-14T00:40:50+5:302016-03-14T00:43:09+5:30
चंद्रकांतदादा पाटील : नगरसेवकांना आवाहन; कचरावेचक महिलांना ओळखपत्र प्रदान कार्यक्रम
कोल्हापूर : शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात किमान तीन ‘विकेंद्रित घनकचरा केंदे्र’ उभारून त्याची जबाबदारी कचरावेचक महिलांकडे द्यावी, यामुळे रोजगार व वीजनिर्मितीबरोबरच कचरा निर्मूलन होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे केले. यासाठी आयुक्तांनी नगरसेवकांना सक्ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘एकटी’ व ‘अवनि’ या संस्थांतर्फे लक्ष्मीपुरीत दलाल मार्केट परिसरात कचरावेचक महिलांना ओळखपत्रासह साहित्य वितरण व पर्यावरणपूरक पिशवी महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, ‘अवनि’ संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, सचिव संजय पाटील, नगरसेविका अश्विनी बारामते, उमा इंगळे, माजी नगरसेवक आदिल फरास, डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कचरावेचक महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना अधिक बळ देण्याची गरज आहे. नगरसेवकाने आपल्या प्रभागात तीन ‘विकेंद्रित घनकचरा केंदे्र’ उभी करावीत. त्यामुळे एका केंद्रावर दोन याप्रमाणे जवळपास ५०० महिलांना रोजगार मिळेल. आयुक्तांनी कचरा वर्गीकरणासाठी प्रत्येक घरात दोन बकेट्स द्याव्यात.
ते पुढे म्हणाले, कचरावेचक महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांसह अन्य संस्थांची प्रशासकीय पातळीवर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. अशा बैठका जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन संबंधितांशी चर्चा करावी.
यावेळी अनुराधा भोसले यांचे भाषण झाले. यावेळी तनुजा शिपूरकर, जैनुद्दीन पन्हाळकर, जयश्री कांबळे, आसावरी माळकर, फ्रान्सिस्का डिसोझा, आदींसह कचरावेचक महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
रात्रनिवारा इमारतीसाठी निधी देऊ
सध्या ‘एकटी’ संस्थेकडे असणारे रात्रनिवारा शेड अपुरे पडत आहे. त्यामुळे दलाल मार्केटमधील महापालिकेचे रिकामे गाळे यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अनुराधा भोसले यांनी यावेळी केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी आयुक्तांनी एखादा खुला भूखंड उपलब्ध करून दिल्यास रात्रनिवाऱ्यासाठी आमदार निधीतून इमारत बांधून देऊ, अशी ग्वाही दिली.
वीटभट्टीवरील मुलांसाठी ४० बसेस
वीटभट्टीवरील मुलांना शाळेत जाण्यासाठी ४० बसेस देणार असल्याची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केली. या बसेस जूनमध्ये उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.