मतदान केंद्राच्या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करा :दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:32 AM2020-11-19T10:32:23+5:302020-11-19T10:36:18+5:30
elecation, pune,collcatoroffice, kolhapurnews पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष स्थापन करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली.
कोल्हापूर : पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष स्थापन करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या पूर्वतयारी व नियोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीसाठी मोठी मतपत्रिका होणार असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मतपत्रिकेची घडी कशी घालावी याबाबत सर्वांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. मदत कक्षासाठी तालुका आरोग्याधिकारी यांनी समन्वयक अधिकारी म्हणून काम करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांना मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करणे महत्त्वाचे असून यासाठी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी महापालिका क्षेत्रासाठी काम पाहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, समन्वय अधिकारी उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग आवश्यक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी अखंडित वीजपुरवठा राहील यांची खबरदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्य पर्यायी व्यवस्थाही करून ठेवावी. मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफीची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.