नवा ‘आयटी पार्क’ करा, पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:02+5:302021-02-15T04:21:02+5:30
चुकीच्या धोरणाचा फटका, निव्वळ घोषणा राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १ मे २००२ रोजी कोल्हापुरातील पद्मावतीनगर परिसरात आयटी पार्कचे ...
चुकीच्या धोरणाचा फटका, निव्वळ घोषणा
राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १ मे २००२ रोजी कोल्हापुरातील पद्मावतीनगर परिसरात आयटी पार्कचे उद्घाटन झाले. या पार्कमध्ये २२ हजार स्क्वेअर फुटांची मोठी इमारत उभारून पायाभूत सुविधा तातडीने पुरविण्यात आल्या. बाहेरील कंपन्यांना संधी देण्याचे तत्कालीन शासनाचे धोरण चुकले आणि त्याचा फटका या पार्कला बसला. त्यानंतर २००८ मध्ये शासनाने हा पार्क खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला. सध्या याठिकाणी चार कंपन्या कार्यान्वित आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात मोठा आयटी पार्क उभारण्याचे आश्वासन दिले. आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घोषणा केली आहे. एकूण यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून आयटी पार्कबाबत निव्वळ घोषणा होतात. पुढील कार्यवाही वेगाने होत नसल्याचे वास्तव आहे.
चौकट
स्थानिक पार्कबाबत असे नियोजन
स्थानिक आयटी उद्योजकांसाठीच्या नव्या आयटी पार्कसाठी जागा मिळाल्यास त्यापैकी २० हजार स्क्वेअर फूट जागेवर बांधकाम केले जाईल. तसेच २०० ते ८०० स्क्वेअर फुटाचे युनिट लहान कंपन्यांना दिले जातील. उर्वरित जागेवर प्लॉट पाडून ते मागणी व गरजेनुसार आयटी कंपन्या, संस्थांना दिले जाणार आहेत.
चौकट
महापालिकेकडून विलंब
आयटीपार्कसाठी बाहेरील कंपन्या येथे येण्यास इच्छुक आहेत. मात्र ज्या ठिकाणी आयटी पार्क करायचे आहे, तेथे पायाभूत सुविधा देण्याबरोबर आयटीपार्कसंदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यास विलंब होत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या महिन्यात निदर्शनास आणून दिले.
चौकट
नव्या कंपन्यांबाबत प्रश्न
कोरोनामुळे आयटी क्षेत्रात सध्या ऑफिस स्पेस वर्क संकल्पना मागे पडली असून, ‘वर्क फ्रॉम होम’ने गती घेतली आहे. त्यामुळे मोठा आयटी पार्क झाल्यास त्याठिकाणी नव्या कंपन्या येतील का? हा प्रश्न असल्याचे स्थानिक उद्योजकांनी सांगितले.
स्थानिक आयटी पार्कबाबतची पाऊले
सन २०१० : आयटी असोसिएशनकडून जागा मागणीचा प्रस्ताव महापालिकेला सादर
सन २०१४-१५ : महापालिकेकडून साडेतीन एकर जागा मंजूर
सन २०१७-१८ : सव्वातीन एकर जागेवर आयटी पार्कचे आरक्षण
जिल्ह्यातील आयटी क्षेत्र दृष्टिक्षेपात
बीपीओ, आयटी सर्व्हिस, सॉफ्टवेअर्स डेव्हलर्पमधील उद्योजक : १५०
हार्डवेअर क्षेत्रातील उद्योजक : ३००
कॉम्प्युटर्स डीलर्स : ५००
रोजगाराची संख्या : सुमारे दहा हजार