कोल्हापुरात नवा ‘आयटी पार्क’ करा; पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:13+5:302021-02-15T04:21:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे; पण आमच्यासाठी ...

Set up a new IT park in Kolhapur; But first give space to local entrepreneurs | कोल्हापुरात नवा ‘आयटी पार्क’ करा; पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या

कोल्हापुरात नवा ‘आयटी पार्क’ करा; पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे; पण आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा आधी सरकार आणि महानगरपालिकेने आम्हाला द्यावी, अशी मागणी स्थानिक आयटी उद्योजकांनी केली आहे. जागा हस्तांतरणासाठी गेल्या बारा वर्षांपासून हे उद्योजक प्रतीक्षा करीत आहेत. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा शनिवारी (दि. १३) केली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील सध्याच्या आयटी उद्योगांची स्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. स्वत:च्या ताकदीवर कोल्हापूरमधील आयटी उद्योग कार्यरत आहे. त्यात बीपीओ, सॉफ्टवेअर्स डेव्हलर्स, हार्डवेअर, कॉम्प्युटर्स डीलर्स आदींचा समावेश आहे. व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तार आवश्यक असल्याने ‘आयटी असोसिएशन’च्या माध्यमातून या उद्योजकांनी आयटी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले. त्याला महानगरपालिकेने सकारात्मक साथ देत टेंबलाईवाडीतील टिंबर मार्केट परिसरातील साडेतीन एकर जागा मंजूर केली. ‘आयटी असोसिएशन’च्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने सव्वातीन एकर जागाही आयटी पार्कसाठी आरक्षित केली. मात्र, अजून ती जागा या असोसिएशनकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागेतील ४० टक्के जागा स्थानिक उद्योजकांना देण्याचा नवा प्रस्ताव महापालिकेचा आहे. ही जागा असोसिएशनकडे हस्तांतरित केल्यास स्थानिक उद्योजकांना बळ मिळेल. रोजगारवाढीसह जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. कौशल्य असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकूलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे पर्यटन क्षेत्राप्रमाणेच देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये ॲण्ड्रॉइड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानांवर काम चालते. स्थानिक आयटी उद्योगामुळे सध्या सुमारे दहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. ते लक्षात घेऊन स्थानिक उद्योजकांना लवकर जागा मिळणे आवश्यक आहे.

-----------------------------------

कोट........

स्थानिक आयटी उद्योजकांना बळ देण्यासाठी नवा पार्क उभारण्यासाठी असोसिएशनचा गेल्या १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. जागा आरक्षित झाली. केपीएमजी या सल्लागार कंपनीने महापालिकेला अहवाल दिला आहे. त्यावर वेगाने कार्यवाही करून महापालिकेने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. सरकार करणार असलेल्या नव्या पार्कला आमची हरकत नाही.

- शांताराम सुर्वे, अध्यक्ष, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर.

-----------------------------------

कोट.....

बाहेरील कंपन्या एखाद्या शहरात जाण्यापूर्वी तेथील स्थानिक उद्योगांचा सेटअप लक्षात घेतात. त्यामुळे स्थानिक आयटी उद्योजकांना पाठबळ देणे आधी महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने महापालिका, राज्य सरकारने वेगाने पावले टाकावीत.

-विनय गुप्ते, स्थानिक आयटी उद्योजक

-----------------------------------

Web Title: Set up a new IT park in Kolhapur; But first give space to local entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.