चाकोरीबद्ध मांडणीला बगल देत ‘थांग’ साकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:45 AM2017-12-18T00:45:39+5:302017-12-18T00:46:45+5:30

Setting up a chaotic arrangement has begun 'Thang' | चाकोरीबद्ध मांडणीला बगल देत ‘थांग’ साकारला

चाकोरीबद्ध मांडणीला बगल देत ‘थांग’ साकारला

Next


कोल्हापूर : एकरेषीय चित्रपटाची मांडणी मला आवडत नाही. त्यामुळे चाकोरीबद्ध मांडणीला बगल देऊन ‘थांग’ चित्रपट साकारला आहे, असे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी रविवारी येथे सांगितले.
येथील कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेल्या ‘थांग’ या चित्रपटावर त्यांनी प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला. राजर्षी शाहू स्मारक भवनातील या कार्यक्रमास दिग्दर्शिका संध्या गोखले प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी संवाद साधला. पालेकर म्हणाले, कलाकाराने साकारलेली कोणतीही कलाकृती अथवा आविष्कार पाहताना त्याने मांडलेली चौकट, पर्याय प्रेक्षकांनी लक्षात घेणे आवश्यक आहेत. मराठीतून एकरेषीय साहित्य फार वर्षांपूर्वीच निघून गेले आहे. एकरेषीय चित्रपटाची मांडणी करणे मला आवडत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आणि त्यांना विविध पद्धतींनी विचार करायला लावेल, अशी कलाकृती साकारणे आव्हान मानतो. त्यातून ‘थांग’ साकारला. समलैंगिकतेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या जोडप्याच्या आयुष्यातील घालमेल यात मांडली. या चित्रपटात लैंगिकतेचा विषय मांडला असून, जो खुलेपणाने बोलणे वर्ज्य आहे. त्यामुळे त्याची मांडणी एकरेषीय नाही. दिग्दर्शिका गोखले म्हणाल्या, जसा नात्यांचा ‘थांग’ लागत नाही, त्या पद्धतीने प्रेक्षकांनी अर्थ घेणे अभिप्रेत आहे. प्रेक्षकांनी विविध पद्धतींनी कलाकृती समजून घेतली पाहिजे.
यावेळी अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाचे सचिव रणजित जाधव यांच्या हस्ते दिग्दर्शक पालेकर, दिग्दर्शिका गोखले यांचा सत्कार केला. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, मनीष राजगोळकर, आदी उपस्थित होते.

अमोल पालेकर म्हणाले...
दहा वर्षांपूर्वीचा ‘थांग’ पुन्हा करायचा विचार केल्यास आजची स्थिती पाहता तो अधिक कडवट बनविला असता.
आपल्या संवेदना गोठल्या अथवा दाबल्या जातील अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये. यासाठी तुम्हा-आम्हाला जे-जे करता येईल, ते केले पाहिजे.

‘चाफा’, ‘ठिय्या’
लघुपट प्रथम
या महोत्सवात कथात्मक आणि लघुपट या प्रकारांत लघुपट स्पर्धा घेतली. यातील लघुपट प्रकारात ‘ठिय्या’ने प्रथम क्रमांक पटकविला. कथात्मक प्रकारामध्ये ‘चाफा’ने प्रथम, कोल्हापूरच्या ‘डेरू’ने द्वितीय, तर ‘सफर’ लघुपटाने तृतीय क्रमांक मिळविला. या लघुपटांच्या संघाला प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.

Web Title: Setting up a chaotic arrangement has begun 'Thang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.