‘जलयुक्त’च्या शिवारात लाखोंचे ‘सेटिंग’

By admin | Published: May 25, 2017 01:19 AM2017-05-25T01:19:45+5:302017-05-25T01:19:45+5:30

साखरी-म्हाळुंगे येथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर : हर्षल सुर्वेंना तीन लाख दिल्याचा दावा; आणखी लाख देण्याची आॅफर

'Setting' of lakhs in 'Jalukta' Shivar | ‘जलयुक्त’च्या शिवारात लाखोंचे ‘सेटिंग’

‘जलयुक्त’च्या शिवारात लाखोंचे ‘सेटिंग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : साखरी-म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथील ‘जलयुक्त शिवार’ योजनेंंतर्गत बांधलेल्या मातीबांध बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामाचा पंचनामा करण्यासाठी बुधवारी गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी चक्क लाखोंची आॅफर दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांना तीन लाख दिल्याचे सांगत आणखी लाख रुपये देतो; पण हे प्रकरण वाढवू नये, अशी विनंती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरच मोबाईलच्या स्पीकर फोनवर उघड झाल्याने एकच खळबळ उडाली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी साखरी-म्हाळुंगे येथील बंधाऱ्यावर जाऊन निकृष्ट कामाचा भांडाफोड केला. अगोदर कल्पना देऊनही तालुका कृषी अधिकारी नामदेव परीट आले नसल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर मोबाईलचा स्पीकर आॅन करून त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पवार म्हणाले,‘तुम्ही कुठे आहात..? त्यावर परीट म्हणाले, ‘मी कोल्हापुरात आहे. मी तुम्हांला भेटायला येतो.’ त्यावर पवार म्हणाले, ‘भेटायला येऊ नका..तुम्हांला तीन आठवडे झाले सांगितले की कामांत ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करा म्हणून; परंतु तरीही तुम्ही त्या दुरुस्त केलेल्या नाहीत.’ त्यावर परीट यांनी माझे चुकले असल्याचे सांगितले आणि त्यांनी हा फोन तिथेच उभे असलेल्या शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश पाटील यांच्याकडे दिला.
प्रकाश पाटील फोनवर म्हणाले, ‘पवारसाहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे. मी येऊन तुम्हाला भेटतो आणि विषय संपवतो.’ पवार त्यावर संतप्त होऊन म्हणाले, ‘मला हापूस देणार, तोतापुरी की पायरी देणार आहेस..? तू येऊन भेटतो म्हणतोस आणि तो येऊन भेटतो म्हणत आहे. त्यावर कार्यकर्त्याने परीट यांच्याकडे फोन दिला व परीट म्हणाले, ‘साहेब तुम्ही काय म्हणाल ते देतो. तुम्हाला हापूसच देतो.’
त्यावर संजय पवार म्हणाले, ‘हापूस म्हणजे किती देणार..? त्यावेळी परीट अडखळले व त्यांनी थेट तुमच्या सुर्वेंना तीन दिलेत त्यातील तुम्ही एक घ्या आणि आणखी एक आणून देतो असे सांगितले. त्यावर पवार भडकले. तुम्ही मला एक कोटी रुपये दिले तरी हा विषय थांबवणार नाही. हा प्रश्र्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विकत घऊ शकत नाही.’ त्यांनतर हा संवाद संपला; परंतु हा संवाद पत्रकारांच्या समोरच झाल्याने गैरव्यवहार चव्हाट्यावर आला.
मुख्यमंत्र्यांनी पाणी मुरविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली, पण तिथे पैसा मुरत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. पैसे नेमके कोणाला दिले, याचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.


मला तीन लाख दिल्याचा आरोप परीट यांनी केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. - हर्षल सुर्वे
जिल्हाप्रमुख, युवा सेना

आपण ‘हापूस’, ‘पायरी’ अशी भाषा बोललोच नाही. शिवसेनेचा कार्यकर्ताच अशी आॅफर देत होता. त्यामुळे या वक्तव्याशी काहीच संबंध नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. या बंधाऱ्याच्या कामाचा एक रुपयाही दिलेला नाही, चौकशीत दोषी आढळल्यास निश्चित कारवाई होईल.
- नामदेव परीट, कृषी अधिकारी, गगनबावडा



बंधारे चुकीच्या ठिकाणी बांधले आहेतच, पण कामेही अतिशय निकृष्ट केली आहेत. कृषी अधिकारी, ठेकेदारांनी संगनमताने सरकारच्या पैशांवर दरोडा घातला आहे. ‘जलयुक्त’च्या कामाबाबत मुख्यमंत्री महोदयांचा दावा फोल ठरला असून, जिल्ह्यातील सर्व कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. - संजय पवार, जिल्हाप्रमुख,शिवसेना


दृष्टिक्षेपात बंधारेठेकेदार - जयंत अनंत नाईक एकूण बंधारे - २०
एकूण खर्च - ८० लाख रूपये क्षमता - २२.४८ टीसीएम
एका बंधाराचा खर्च - ५ लाख २७ हजार ३१० रुपये



मातीच्या ढिगाऱ्याला मुरुमाचे पिचिंग
‘जलयुक्त’ची निकृष्ट कामे : साखरी-म्हाळुंगे येथील कामाचा सेनेकडून पंचनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत १८ ठिकाणी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या मातीनाला बंधाऱ्यांचा शिवसेनेने बुधवारी पंचनामा केला. साखरी-म्हाळुंगे येथील कामात मातीच्या ढिगाऱ्यावर चक्क ढिसूळ जांभा दगडाच्या कपरा लावून पिचिंग करण्याचा प्रताप ठेकेदाराने केला आहे. त्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणेचे हात पावसाळा आधीच ओले केल्याने या तळ्यात पाणी मुरण्याची शक्यता कमी असली तरी पावसाळ्याआधीच पैसा निश्चित मुरल्याचे स्पष्ट होते.
गगनबावडा तालुक्यात ‘जलयुक्त’ अंतर्गत २० बंधारे बांधण्यात आले आहेत, त्यापैकी अठरा कामे ही साखरी-म्हाळुंगे परिसरात झाली असून, त्यासाठी ६७ लाख रुपये खर्च झाला आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे शिवसेनेचे कार्यकर्ते शहाजी देसाई यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांच्या (पान ६ वर )

Web Title: 'Setting' of lakhs in 'Jalukta' Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.