ऑक्सिजन प्रकल्प उभारुन बिद्रीने समाजाप्रती उत्तरदायित्व जपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:18+5:302021-07-17T04:20:18+5:30
प्रकल्प भेटीवेळी गौरवोद्गार लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्य सध्या कोरोनाचा मुकाबला करीत आहे. गंभीर रुग्णांना ...
प्रकल्प भेटीवेळी गौरवोद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्य सध्या कोरोनाचा मुकाबला करीत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत बिद्री साखर कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारुन सहकाराला नवी दिशा दिली आणि सामाजिक बांधिलकीतून समाजाचे उत्तरदायित्वही जपले असे गौरवोदगार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टोपे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी बिद्री साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, बिद्री साखर कारखाना साखर उतारा, एफआरपी देण्यात कायम आघाडीवर राहिला आहे. ज्याप्रमाणे सहवीज प्रकल्पातून उत्पन्न सुरु ठेवले त्याच पद्धतीने आता कारखान्याने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे. कोरोनाच्या दोन्ही लाटा आपण परतवून लावल्या, तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण ही कवचकुंडले आहेत. सर्व नियमांचे पालन करावे.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील म्हणाले, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. राज्य शासनाने मोठ्या ऑक्सिजन प्रकल्पांना अनुदान देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बिद्री सारख्या लहान प्रकल्पांनाही शासनाने अनुदान देण्याची भूमिका घ्यावी.
यावेळी कारखाना संचालक प्रवीणसिंह पाटील, धनाजीराव देसाई, प्रवीण भोसले, के. ना. पाटील, उमेश भोईटे, राजेंद्र पाटील , श्रीपती पाटील, युवराज वारके, एकनाथ पाटील, विकास पाटील, अशोक कांबळे, आजऱ्याचे सभापती उदय पवार, मुकुंद देसाई, आर. वाय. पाटील, भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.
चौकट
बिद्रीचे टाईमली काम
कोरोना महामारीत ऑक्सिजन अभावी अनेकांनी जीव गमावला, याचे गांभीर्य ओळखून शासनाने ऑक्सिजन निर्मितीला प्रोत्साहन दिले. बिद्री साखर कारखान्याने या प्रकल्पाची काटकसरीने तत्काळ उभारणी केली. ही वेळेची गरज ओळखून टाईमली काम केले आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव वाचणार आहे असे मंत्री टोपे म्हणाले.
.
फोटो : बिद्री साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली. यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे आदी उपस्थित होते.