मदन नाईक खूनप्रकरणी एसआयटीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:00 AM2019-05-14T01:00:01+5:302019-05-14T01:00:06+5:30
कोल्हापूर : ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे जावई आणि उद्योजक मदन वसंतराव नाईक (वय ६९, रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) ...
कोल्हापूर : ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे जावई आणि उद्योजक मदन वसंतराव नाईक (वय ६९, रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) यांच्या खूनप्रकरणी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करून तपास करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूर पोलिसांना दिले.
नाईक यांच्या पत्नी पारू नाईक, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी सावंत आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तातडीने तपासाची मागणी केली होती.
कारदगा (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील रेंदाळ-कारदगा रस्त्यावर २५ जानेवारी २०१९ रोजी मदन नाईक यांचा मृतदेह आढळला होता. अज्ञातांनी त्यांच्या डोक्यात वर्मी घाव घालून खून करून हात-पाय बांधून मृतदेह उसाच्या शेतात टाकून दिला होता. याप्रकरणी कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अद्यापही येथील पोलिसांच्या हाती ठोस पुरावे नाहीत.
नाईक यांचे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील शेताकडे जाणे-येणे होते. २१ जानेवारी २०१९ रोजी ते या मार्गावरून बेपत्ता झाले. मोबाईल कॉल डिटेल्स, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. तीन आठवड्यांच्या तपासामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. कोल्हापूर पोलिसांची पाच पथके या तपासावर लक्ष ठेवून आहेत. तरीही अजूनही पोलीस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. म्हणूनच त्यांच्या पत्नी पारू नाईक यांनी फडणवीस यांची भेट घेतली.