याटिंगमध्येही ‘सेटिंग’

By admin | Published: December 27, 2014 12:07 AM2014-12-27T00:07:20+5:302014-12-27T00:18:39+5:30

महापालिका ‘स्थायी’ बैठक : मोफत परवानगी दिल्याने सदस्यांकडून प्रशासन धारेवर

In the 'Settings' | याटिंगमध्येही ‘सेटिंग’

याटिंगमध्येही ‘सेटिंग’

Next

कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांना बोटिंगचा आनंद घेता यावा, तसेच पाणी हलल्याने नैसर्गिकरीत्या पाण्यातील आॅक्सिजनचे पुनर्भरण व्हावे, या उद्देशाने रंकाळ्यात सुरू केलेल्या बोटिंगसाठी पाच वर्षांसाठी ८१ लाख रुपये ठेकेदाराकडून भरून घेण्याचा प्रस्ताव आहे. याउलट नागरिकांकडून पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम वसूल करणाऱ्या ‘याटिंग’ या खेळ प्रकारासाठी दहा वर्षे मोफत परवानगी दिली आहे. या प्रकाराबाबत आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले.
रंकाळ्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. यासाठी दररोज आंदोलने करून नागरिक प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. रंकाळ्याच्या दुखण्याकडे सोपस्कारपणे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा आणखी एक प्रकार आजच्या स्थायी बैठकीत समोर आला. रंकाळ्याजवळील पक्षी निरीक्षणाची जागा याटिंग या महागड्या खेळ प्रकारासाठी मोफत देण्यात आली आहे. रंकाळ्याची भौतिक दुर्दशा करून मन भरले नाही, आता प्रशासनाने नैसर्गिक नुकसान करण्यास सुरुवात केल्याचा गंभीर आरोप राजू लाटकर व शारंगधर देशमुख या सदस्यांनी बैठकीत केला. बोटिंगच्या माध्यमातून रंकाळ्यातील पाणी ढवळून निघते. यामुळे नैसर्गिकरीत्या आॅक्सिजनचे पुनर्भरण होण्यास मदत होते. तसेच नागरिकांना नौकाविहाराचा आनंदही मिळतो. या बोटिंगचा ठेका मनपा प्रशासनाने पाच वर्षांसाठी ८१ लाख रुपयांना देऊ केला आहे. याउलट नागरिकांकडून पाच ते सात हजार रुपये उकळणाऱ्या याटिंग या खेळ प्रकारासाठी पक्षी निरीक्षण केंद्राची जागा बहाल केली आहे.
याटिंगला रंकाळ्यात दहा वर्षांसाठी मोफत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कोणीही यावे आणि महापालिकेची मोफत जागा वापरावी, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप सदस्यांनी केला. (प्रतिनिधी)

याटिंगसाठी स्थायी समितीची मंजुरी आहे. तांबट कमान येथील जागा याटिंगला दिली आहे. पक्षी निरीक्षणाची नाही. तरीही याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी स्थायी बैठकीत दिले. याटिंगसाठी स्थायीची परवानगी घेतली होती, तर सदस्यांना याची माहिती कशी
नाही ? माहिती असूनही सदस्य हा विषय का उपस्थित करीत आहेत? या ठरावाची माहिती सदस्यांना नाही, मग हा ठराव नंतर घुसडण्यात आला आहे काय ? अशी उलट-सुलट चर्चा महापालिकेत जोरदार सुरू आहे.



आरोग्य निरीक्षक, सफाई कामगारांचे साटेलोटे
महापालिकेतील अनेक आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी यांच्यात संगनमत आहे. पुरेसे सफाई कर्मचारी असूनही आरोग्य यंत्रणेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उशिरा येत असल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व प्रकाराला चाप लावण्यासाठी कायदेशीर कारवाईची नोटीस वैद्यकीय अधिकारी व आरोग्य निरीक्षकांना बजावण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी आज, शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात पाच डॉक्टरांची नेमणूक आहे. मात्र, एकही डॉक्टर वेळेत हजर राहत नाहीत, अशी येथील रुग्णांची तक्रार असते. रुग्णांना दोन तासांहून अधिक काळ डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागते. सावित्रीबाई फुले, पंचगंगा व आयसोलेशन हॉस्पिटल अशी तीन मोठी, तर २५ लहान आरोग्य कें दे्र सेवेत आहेत. यामध्ये विविध पदांवर दीड हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे; तर ३०हून अधिक डॉक्टर्स सेवेत आहेत. सर्व रुग्णालयासह आरोग्य केंद्रातून तब्बल पाचशेहून अधिक रुग्णांना लाभ होतो. मात्र, या रुग्णालयात डॉक्टर्सची मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याची गंभीर दखल घेऊन रुग्णालयात वेळेवर हजर न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांसह पुरेशी यंत्रणा आहे. मात्र, आरोग्य निरीक्षकांकडून काही कर्मचाऱ्यांचे लाड केले जात आहेत. नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जातात. पुरेशी सामग्री असूनही कामात दिरंगाई केली जाते. हा प्रकार येथून पुढे खपवून घेतला जाणार नाही. कामात दिरंगाई करणाऱ्या आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

Web Title: In the 'Settings'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.