सेवा रुग्णालयातील डॉक्टरांचे साहित्य चोरणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:35+5:302021-05-03T04:18:35+5:30
कोल्हापूर : लाईन बाजारमधील सेवा रुग्णालयात डॉक्टर व रुग्णांचे साहित्य चोरणाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी पाळत ठेवून पकडले. बाबू महादेव मधाळे ...
कोल्हापूर : लाईन बाजारमधील सेवा रुग्णालयात डॉक्टर व रुग्णांचे साहित्य चोरणाऱ्याला शाहूपुरी पोलिसांनी पाळत ठेवून पकडले. बाबू महादेव मधाळे (वय ३८, रा. कनानगर, कोल्हापूर, मूळ रा. भैरापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सेवा रुग्णालयातील महिला डॉक्टरची चार महिन्यांपूर्वी पैसे व साहित्याची हॅण्डबॅग चोरल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २ जानेवारी रोजी सेवा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीना महादेव बारवाडे (रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) ह्या केबीनमध्ये रुग्णांची तपासणी करत असताना, त्यांची खांद्याला अडकवण्याची लेदरची हॅण्डबॅग अज्ञाताने चोरली होती. या बॅगेमध्ये दैनंदिन कामकाजाचे साहित्य व पैसे होते. बारवाडे यांनी चोरीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सेवा रुग्णालयात पाळत ठेवली. शनिवारी (दि. १) सकाळी डी. बी. पथकातील शुभम संकपाळ हे रुग्णालय आवारात पाळतीवर असताना एकजण संशयितरित्या आढळला. त्याच्याकडे चौकशी करताच त्याने दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे पोहोचलेल्या इतर पोलिसांनी त्याला पकडले. त्याने आपले नाव बाबू मधाळे असल्याचे सांगून जानेवारीमध्ये डाॅक्टरांची हॅडबॅग चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील जप्त केलेली दुचाकीही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील ऋषिकेश पवार, सागर माने, शुभम संकपाळ, अनिल पाटील, सुशांत पाटील आदींनी केली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्याचा निघाला माग
जानेवारीमध्ये सेवा रुग्णालयात चोरी करताना संशयित हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. त्यामुळे फुटेजमधील संशयिताचे छायाचित्र रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना दाखवून त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. त्यानुसार चोरटा जाळ्यात सापडला.
फोटो नं. ०२०५२०२१-कोल-बाबू मधाळे (आरोपी)
===Photopath===
020521\02kol_3_02052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. ०२०५२०२१-कोल-बाबु मधाळे (आरोपी)