टोप येथे सात कोटींचा कृत्रिम वाळूचा प्रकल्प : नंदकुमार मिरजकर, आबीद मुश्रीफ यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:41 PM2018-10-24T23:41:51+5:302018-10-24T23:48:07+5:30
बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय आहे. म्हणूनच आम्ही टोप येथे सात कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला असून, एम. एम. ग्रुपच्या राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पातून बांधकाम, गिलाव्यासाठी लागणारी वाळू लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे
सतीश पाटील ।
शिरोली : बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय आहे. म्हणूनच आम्ही टोप येथे सात कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला असून, एम. एम. ग्रुपच्या राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पातून बांधकाम, गिलाव्यासाठी लागणारी वाळू लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे उद्योजक नंदकुमार बाळासो मिरजकर व आबीद हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
पर्यावरणाचा ºहास होत असल्याने बऱ्याच वर्षांपासून नदीतील वाळू उपसा बंद झाला आहे. त्यामुळे मधल्या काळात बांधकाम व्यवसाय अडचणीत आला होता. अनेक बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर होती. याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरांवर झाला होता. मात्र, या समस्येला कृत्रिम वाळूने मोठा आधार पुढे केला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाळू उपसाबंदी आहे. मात्र, वाळू उपलब्ध नसल्यामुळे एकीकडे प्रकल्प उभारणीवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. लहानसहान व्यावसायिकांना वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावी लागत आहे. सामान्य माणूस अडचणीत आला असून, घरबांधणीसाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचला आहे. याला उत्तम पर्याय हा फक्तकृत्रिम वाळूच आहे. शासकीय विभागाकडून करण्यात येणारे घरकुल, शौचालय, रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी भविष्यात शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, काँक्रीट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट, रेडिमिक्स फ्लॅट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूच पर्याय असणार आहे.
या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता वाढते आहे, असे बांधकाम अभियंत्यांचे म्हणणे आहे. कारण नैसर्गिक वाळू गोलाकार असते, तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. कोनिकल अँगलमुळे या बांधकामात घट्टपणा येतो. ती अधिक मजबुतीने चिकटली जाते. एम. एम. कन्स्ट्रक्शनने टोप येथे प्रशस्त जागेत सुमारे सात कोटी रुपयांचा राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनचा मोठा अत्याधुनिक कृत्रिम वाळूचा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पातून लवकरच कृत्रिम वाळू उत्पादन सुरू होणार आहे.
एम. एम. ग्रुपचा राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनचा टोप येथे कृत्रिम वाळू व गिलावा वाळू प्रकल्प उभारला असून, जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. नदीच्या वाळूपेक्षा चांगली दर्जेदार वाळू या ठिकाणी तयार होणार आहे. या ठिकाणी बसविलेली अॅसेम्बल मशिनरी ही गोवा, गुजरात, सातारा, पुणे, नाशिक येथून आणली आहे. गिलावा वाळू आणि काँक्रीट वाळू दोन्ही प्रकल्प यशस्वी उभारलेले आहेत. हे प्रकल्प उभारण्यासाठी पंकज खलीफ व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत.