जिल्हा बँकेचे इमारत भाड्यावर सात कोटी खर्च
By admin | Published: September 24, 2015 11:22 PM2015-09-24T23:22:27+5:302015-09-24T23:52:00+5:30
मुख्य शाखेची एकच इमारत स्वमालकीची : १९१ शाखा भाड्याच्या इमारतीत, भाड्याच्या अॅडव्हान्सवर ११ लाख रुपये खर्च
प्रकाश पाटील - कोपार्डे -जिल्हा बँकेला तोट्यातून बाहेर काढण्याचे अनेक मार्ग आहेत. आपली स्थावर मालमत्ता उभी करण्याच्या अनेक संधी आजही हातात असताना प्रशासकीय पातळीवरील उदासिनतेचा मोठा फटका बँकेच्या आर्थिक बाबींवर स्पष्ट दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे जिल्हा बँकेने केवळ इमारत भाडे, कर, दिवाबत्ती व भाडे अॅडव्हान्स यावर सात कोटी तीन लाख चार हजार ३३८ रुपये अहवाल सालात खर्च करून आपल्या व्यापारवृद्धीचे दिवाळे काढल्याचे सहकारातील तज्ज्ञांकडून मत व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शेती व बिगर शेतीसाठी पतपुरवठा करणारी शिखर बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. शेतकरी व काही उद्योग यांचा आर्थिक कणा म्हणजे जिल्हा बँक. सावकारी पाशातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकांची निर्मिती झाली असली, तरी व्यावसायिक नीती ठेवून कारभार करण्याकडे आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी प्रयत्नच केला गेला नसल्याने जिल्हा बँकेचा एकूण तोटा १0३ कोटी १३ लाख ४५ हजार ८ रुपये अहवाल सालात दिसत आहे.
जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील साखर कारखाने सूतगिरण्या, प्रक्रिया उद्योग, खरेदी- विक्री संघ यांना वारेमाफ कर्ज दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बिगर शेती कर्जदारांपैकी अवसायनात निघालेल्या संस्थांकडे ३७ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२१ रुपये एवढी थकबाकी आहे. या संस्थांच्या मालकीच्या बहुतांश ठिकाणी स्थावर मालमत्ता आहेत. यात जागेसह इमारती ही आहेत. या संस्थांच्या थकबाकी पोटी स्थावर मालमत्तेतील इमारती किंवा जागा जिल्हा बँकेने आपल्या मालकीच्या करून स्वमालकीच्या इमारतीत शाखा उभा करण्याची मोठी संधी जिल्हा बँकेला आजही असल्याचे मत सहकारातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथे थकबाकीदार असणाऱ्या तंबाखू खरेदी-विक्री संघाची जागा व इमारत आहे. मात्र, येथील जिल्हा बँकेची शाखा भाड्याच्या इमारतीत आहे. जर ही इमारत थकबाकी पोटी जिल्हा बँकेने ताब्यात घेतली, तर स्वमालकीच्या इमारतीत शाखा हलवता येऊन इमारत भाडे तर वाचणार आहेच; पण स्थावर मालमत्तेतही वाढ होणार आहे. अशीच परिस्थिती आसुर्ले पोर्ले कारखाना विक्रीस काढला. येथील कारखाना विक्रीच्या वेळीही बँकेच्या शाखेकरिता इमारतीएवढी जागा प्रशासनाला घेता आली नाही. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या व्यावसायिकतेचा अभाव जिल्हा बँकेकडे स्पष्ट दिसतो.
जिल्हा बँकेच्या अहवालात एका मुख्य शाखेबरोबर १९१ अन्य शाखा आहेत. बँकेची स्थावर मालमत्ता केवळ ६५ कोटी ३२ लाख ५१ हजार २४६ एवढी दिसते. यात वर्गीकरण दिसत नाही. जवळजवळ सर्वच शाखा भाड्याच्या इमारतीत असून, केवळ भाड्यावर सात कोटी तीन लाख चार हजार ३३८ रुपये खर्ची पडला आहे. तर भाडे अॅडव्हान्स देतानाही हात सैल सोडण्यात आला असून, ११ लाख २४ हजार २३७ रुपये निधी खर्ची पडला आहे. विद्यमान संचालक मंडळाने संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ करण्याबरोबर इमारत भाड्यासाठी खर्ची पडणारा निधी वाचविण्याची व्यावसायिकता दाखविली, तर बँकेचा तोटा कमी करण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.