रेल्वेतील ‘फुकट्यां’ना सात कोटींचा दंड : नऊ महिन्यांत सव्वालाख जणांचा विनातिकीट प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:36 PM2020-01-13T23:36:10+5:302020-01-13T23:38:06+5:30
मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत
प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत, तिकीट तपासनिसाची नजर चुकवून रेल्वेतून विनातिकीट प्रवास करताना एक लाख २८ हजार लोकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारला.
वेळेत आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रवाशांकडून पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे वर्षाकाठी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कोटींमध्ये आहे. काही मार्गांवरील ठरावीक गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्याचा फायदा घेत, तिकीट तपासनिसांची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. मुख्यत: कमी अंतराच्या व कमी तिकिटाच्या प्रवासातच तिकीट न घेता प्रवास करण्याची मानसिकता जास्त आहे. गर्दीत हळूच बाकावर जाऊन बसणे, तिकीट तपासनीस आल्यावर दुसºया डब्यात जाणे, स्टेशन आल्यावर तत्काळ खाली उतरणे असे प्रकार करून तिकीट चुकविले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी पुणे विभागाने विशेष मोहीम राबविली.
मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत, ज्यातून सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उपविभागीय रेल्वे प्रबंधक, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधकांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, साहाय्यक वाणिज्य प्रबंधक एस. व्ही. सुभाष यांच्या निरीक्षणाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे संरक्षण दलाच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबविली.
- गेल्यावर्षीपेक्षा दंडात १५ टक्क्यांनी वाढ
पुणे विभागाकडून मागील वर्षाच्या याच कालावधीत दोन लाख ५० हजार प्रकरणांत १२ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामध्ये एक लाख १३ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले होते. त्यांच्याकडून सहा कोटी २४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल झाला होता. विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या एकूण रकमेमध्ये दंडात १५ टक्के वाढ झाली. तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.
प्रशासनाकडून तिकीट तपासणी नियमितपणे सुरू असते. गेल्या नऊ महिन्यांत एक लाख २८ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास संबंधित प्रवाशाला आर्थिक दंड व मानहानीस सामोरे जावे लागते. कायद्यांतर्गत दंड भरावा लागतो आणि पैसे न दिल्यास त्यांना तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.