नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:07+5:302021-07-29T04:26:07+5:30

कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे सात दिवसांत पूर्ण करावेत, अशा सूचना करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व ...

Seven days to complete the loss panchnama | नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदत

नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची मुदत

Next

कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे सात दिवसांत पूर्ण करावेत, अशा सूचना करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी बुधवारी दिल्या. सध्या ग्रामीण भागातील पंचनामे सुरू आहेत, तर शहरात आज, गुरुवारपासून या कामाला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात २१ ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुराचा सर्वाधिक फटका करवीर आणि शिरोळ तालुक्यांना बसला आहे. चिखली, आंबेवाडीसारख्या गावांसोबतच कोल्हापूर शहरातील अनेक भागांत पाणी घुसल्याने घरांचे, प्रापंचिक साहित्य व दुकानदार, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून या पूरग्रस्तांना मदत देण्यात येणार असून, यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी हे पंचनामे करणारे तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना करवीर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने पंचनामे कसे करावेत, ते कशा पद्धतीने नोंदवावेत, कोणकोणत्या बाबी तपासाव्यात, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यशाळेत प्रांताधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पंचनाम्यांची कार्यवाही सात दिवसांत संपविण्याची सूचना देण्यात आली. ग्रामीण भागाच्या तुलनेत यंदा शहरात जास्त नुकसान झाल्याने हे पंचनामे करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लागणार आहे.

---

या नुकसानीचे होणार पंचनामे

- घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान

- घराची अंशत: किंवा पूर्णत: झालेली पडझड

- व्यावसायिक, दुकानांचे झालेले नुकसान

- गोठे, पशुधन यांचे नुकसान (कृषी विकास अधिकाऱ्यांमार्फत)

--

नागरिकांनी ही कागदपत्रे तयार ठेवावीत...

- सुरू असलेल्या बँक खात्याचे पासबुक

- आधार, पॅन कार्ड

- महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती

----

फोटो नं. २८०७२०२१-कोल-पंचनामे०१

ओळ : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात बुधवारी तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

Web Title: Seven days to complete the loss panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.