सात मैदाने, ट्रॅक खुले होणार
By admin | Published: March 3, 2015 10:50 PM2015-03-03T22:50:46+5:302015-03-03T23:02:58+5:30
विभागीय क्रीडा संकुल : उद्या औपचारिक उद्घाटन, जलतरण तलावासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा
कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता बनलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या खुले होण्याची गेल्या सहा वर्षांची खेळाडू, करवीरवासीयांची प्रतीक्षा संपली आहे. संकुलाचे औपचारिक उद्घाटन गुरुवारी (दि.५) होणार आहे. यावेळी मातीचा धावपट्टी मार्ग (ट्रॅक), फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलची मैदाने, दोन टेनिसकोर्ट खुली होतील. शूटिंग रेंजचे पूर्णत्व महिनाअखेर होईल. जलतरण तलावासाठी मात्र, तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.प्रशासनाकडे अडकलेली देयके, तांत्रिक अडचणी आदींमुळे गेल्या अडीच वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलाचे काम रेंगाळले. जानेवारीच्या अखेरीस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठेकेदार श्रीहरी असोसिएटस्चे संचालक सचिन मुळे यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यात त्याची देयके अदा करून महिन्याभरात संकुलाच्या कामातील पहिला टप्पा खुला करण्यास सांगितले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील अपूर्णावस्थेतील कामे वेगाने सुरू झाली. संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील सध्या चारशे मीटरचा धावणे मार्ग, दोन टेनिस कोर्ट, प्रेक्षक गॅलरी, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल अशा सात मैदानांचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण पूर्ण झाले असून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. उद्घाटनाची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने काम पूर्णत्वाची ठेकेदार कंपनीची लगबग सुरू आहे. दिवसा मैदाने, ट्रॅकची अपूर्ण असलेली किरकोळ कामे आणि पूर्ण झालेल्या इमारतींच्या रंगरंगोटी, विद्युतीकरण, स्वच्छतेचे काम सुरू आहे. त्यासाठी १५० हून अधिक मजूर कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
————————
‘लोकमत’ने जागे ठेवले
विभागीय क्रीडा संकुलाच्या पायाभरणीपासून ‘लोकमत’ने येथील कामकाज, क्रीडा विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडील कार्यवाहीवर नजर ठेवली. संकुलाच्या बांधकामाचा दर्जा, स्थिती, ठेकेदारासमोरील अडचणी, त्यावरील पर्याय, प्रशासनाची भूमिका, आदींवर सातत्याने प्रकाशझोत टाकला होता. त्यानुसार संकुलाचे काम करणारी कंपनी आणि प्रशासन जागे राहिले. ‘लोकमत’ने जागे ठेवल्याची भूमिका निभावली. त्यामुळे संकुलाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने पुढे जाऊ शकल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ‘शब्द’ दिल्याप्रमाणे कंपनीच्या संचालकांनी कामांची पूर्तता केली. अंतर्गत रस्ते, ट्रॅक आणि टेनिस कोर्टची राहिलेली किरकोळ कामे सध्या पूर्ण केली जात आहेत. शूटिंग रेंजची इमारत पूर्ण झाली असून, काही अंतर्गत कामे सुरू आहेत. त्याची पूर्तता करून रेंज ३१ मार्चपर्यंत खुली केली जाईल. सांडपाणी निर्गतीकरणाबाबत पर्यायांवर काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत जलतरणाचे काम पूर्ण केले जाईल.
- सुहास कुलकर्णी (प्रकल्प व्यवस्थापक, श्रीहरी असोसिएटस्)