शिवाजी पेठ, रुईकर कॉलनीसह शहरात सात हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:44+5:302021-03-28T04:23:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला कोल्हापुरात रोखण्यात प्रशासनास यश येत आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला कोल्हापुरात रोखण्यात प्रशासनास यश येत आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नवीन ७३ रुग्णांची नोंद झाली, तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सात ठिकाणे ही कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
राज्यात सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रोज शेकडो, हजारोंच्या संख्येने नवीन रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात मात्र तुलनेने रुग्णसंख्या एका विशिष्ट पातळीवर स्थीर आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, तसेच पोलीस प्रशासन एकत्रितपणे करीत असलेल्या उपाययोजना आणि नागरिकांचे त्याला मिळणारे सहकार्य यामुळे या दुसऱ्या लाटेला रोखण्यात आजच्या घडीला तरी यश आले असल्याचे दिसून येते. याहीपुढे अधिक काळजी व खबरदारी घेण्याची मात्र आवश्यकता आहे.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नवीन ७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये हारूर, ता. आजरा येथील ७३ वर्षीय पुरुषाचा, तर शहरातील त्रिमूर्ती सोसायटी येथील एका ९३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शनिवारी कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजे ४२ रुग्णांची नोंद झाली. भुदरगड तालुक्यात तीन, गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी, पन्हाळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
- हे आहेत कोल्हापुरातील सात हॉटस्पॉट
शिवाजीपेठ,
शुक्रवारपेठ,
शनिवारपेठ,
लक्ष्मीपुरी,
रुईकर कॉलनी,
मार्केट यार्ड आणि शिवाजी विद्यापीठ
विशेष काळजीची गरज
हॉटस्पॉट ठरलेली सर्वच ठिकाणे दाट लोकवस्ती व बाजारपेठांची आहेत. त्यामुळे तेथे विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महानगरपालिका प्रशासनाने या परिसरात अधिक जनजागृती करण्यासह उपाययोजना करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे.
मार्केट यार्डात प्रबोधन -
महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांनी शनिवारी मार्केट यार्डातील भाजी, फळ, कांदा, बटाटा बाजारात जाऊन व्यापारी, अडते, शेतकरी, तसेच ग्राहकांना कोरोनापासून बचाव करण्याबाबत, तसेच लसीकरण करण्याबाबत प्रबोधन केले. मास्क लावा, शारीरिक अंतर राखा, हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करा, असे आवाहन मोरे यांनी यावेळी केले.