म्हारूळात तलवार हल्ल्यात सातजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:15+5:302021-01-16T04:28:15+5:30
कोल्हापूर : म्हारूळ (ता. करवीर) येथे दागिन्यांच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. यावेळी तलवार, चाकू, काठ्यांचा वापर करण्यात आला. ...
कोल्हापूर : म्हारूळ (ता. करवीर) येथे दागिन्यांच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. यावेळी तलवार, चाकू, काठ्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये सातजण गंभीर जखमी झाले असून, करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही कुटुंबातील जखमींंमध्ये युवराज पाटील, भगवान कवडीक, सारिका कवडीक, रघुनाथ कवडीक, ज्योतीराम खाडे, राधिका कवडीक, विशाल खाडे यांचा समावेश आहे. खाडे व कवडिक हे पैपाहुणे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, म्हारुळ (ता. करवीर) येथे गुरुवारी सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये दागिन्यांवरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. यात सातजण जखमी झाले असून, जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सारिका भगवान कवडीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रघुनाथ पांडुरंग कवडीक, राधिका रघुनाथ कवडीक (दोघेही रा. म्हारुळ), विशाल ज्योतीराम खाडे व ज्योतीराम गणपती खाडे (दोघेही रा. सांगरुळ) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रघुनाथ पांडुरंग कवडीक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित भगवान पांडुरंग कवडीक, सारिका भगवान कवडीक (दोघे रा. म्हारूळ) युवराज सर्जेराव पाटील, विकास लक्ष्मण सावंत (दोघेही रा. आमशी, करवीर) सुहास सर्जेराव पाटील (कसबा बावडा) या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.