सात महिन्यांपूर्वी गीतांजली...आता पल्लवी!

By admin | Published: June 21, 2016 11:41 PM2016-06-21T23:41:49+5:302016-06-22T01:30:56+5:30

दुसरा बळी : छेडछाडीने धगधगतोय धनगरवाडा; गुंडांचा कायमचा बंदोबस्त गरजेचा

Seven months ago, Gitanjali ... now Pallavi! | सात महिन्यांपूर्वी गीतांजली...आता पल्लवी!

सात महिन्यांपूर्वी गीतांजली...आता पल्लवी!

Next

तानाजी पोवार --कोल्हापूर --दारात सुया टोचलेले लिंबू टाकणे, देव घालणे, कौल लावणे अशा अंधश्रद्धेच्या फेऱ्यात आज बोंदे्रनगरातील धनगरवाड्यातील लोकांचा प्रवास सुरू आहे. मोलमजुरीसाठी त्यांचे हात नेहमीच कामात लागले, शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले अन् अशिक्षितपणाची झूल पांघरून हा धनगरवाडा अंधश्रद्धेकडे आपोआप झुकला. गेल्या काही वर्षांत पहाटे, सकाळी काम करून दिवसभर वसाहतीत टिंगल-टवाळी करणाऱ्या युवकांच्या टोळक्याने येथील युवती, महिलांना लक्ष्य करून आपले गुंडगिरीचे बस्तान बसविले. गेल्या सात महिन्यांत गीतांजलीपाठोपाठ पल्लवीचाही या टोळक्याने बळी घेतला.
राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांतील दुर्गम भागातील हा धनगर समाज गेल्या पंचवीस वर्षांत हातांना काम मिळविण्यासाठी हळूहळू कोल्हापूरकडे आला, बोंद्रेनगरानजीक त्यांचा ठिय्या पडला. तीच बनली धनगर वसाहत. फुलेवाडी रिंग रोडवर बोंद्रेनगरनजीक हा सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीचा धनगरवाडा. सोयी-सुविधांच्या गर्तेत अडकलेला हा परिसर आजही पल्लवीच्या मृत्यूने धगधगत आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हा धनगरवाडा नेहमीच वादावादीच्या निमित्ताने जागाच असतो. गुंडगिरीच्या दहशतीमुळे सात महिन्यांपूर्वी याच परिसरातील गीतांजली पंडित बोडके या महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर आता पल्लवी बोडकेचा बळी गेला. दोन्हीही घटना परिसरातील गुंडगिरीच्या टोळक्याच्या छेडछाडीला कंटाळून घडल्या आहेत. गुंड टोळक्यांकडून रोजच येथे नवनवे प्रकार घडतात. या गुंडांच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरीही त्यांच्या दहशतीखाली महिला, युवा पिढी, वयोवृद्ध आहेत.
दुर्गम भागातील काही मोजकीच सात-आठ कुटुंबे गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी रोजगार व कामाच्या शोधासाठी बोंद्रेनगर येथे आली. कामे मिळाल्याने त्यांनी येथेच ठिय्या मारला. हळूहळू वस्ती वाढत आज सुमारे हजार-बाराशेंची वसाहत झाली. पुरुष मंडळी फिरून झाडे तोडणे, हमाली करणे, मार्केट यार्डमधून कांदा-लसूण आणून दारोदारी विक्रीची कामे करतात; तर महिला धुणे-भांड्याची घरकामे करून कुटुंबाचा गाडा चालवितात. बहुतांश युवक हे सकाळी फिरून चारचाकी वाहने धुण्याची कामे करतात. त्यामुळे हे गुंड दिवसभर रिकामटेकडे राहून वसाहतीत कारनामे घडवीत असतात.
मोलमजुरीच्या मागे लागत अशिक्षित राहिलेला हा समाज अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. देवाच्या करणीसाठी श्रेष्ठ मानणाऱ्या विठ्ठलाई देवीचा पगडा या वसाहतीवर जाणवतो; त्यामुळे येथे नेहमीच चौकाचौकांत सुया खोवलेल्या लिंबंूचे दर्शन होते. या अशिक्षित, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांचा गैरफायदा घेत येथे गुंडगिरी फोफावत आहे. (पूर्वार्ध)


गुंडांचा पोलिसांसमोरही मुजोरपणा
पल्लवीचा बळी गेल्यानंतर अटकेसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी पोलिसांसमोरच आपला मुजोरपण दाखवून दिला. हातांत बेड्या घातलेल्या असतानाही या गुंडांनी परिसरातील युवकांनाही ‘आल्यावर बघून घेतो’ अशा उघड-उघड धमक्या दिल्या.त्यांना पोलिसही काही करू शकले नाहीत. त्यामुळे या गुंडांची परिसरात प्रचंड दहशत असल्याचे दिसून येते.
‘निकिता’च्या आधारासाठी वाघमोडे यांचा हात
कोल्हापूर : धनगर समाज क्रांतिकारी संघाचे संस्थापक विलासराव वाघमोडे (बापू) यांनी निकिताच्या घरातील रेशन, शिक्षणाच्या खर्चासह तिच्या आजीच्या औषधाचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने बोडेकर कुटुंब अक्षरश: वाऱ्यावर पडले होते. घरात आजी; पण तीही आजारी असल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी वाघमोडे यांनी बोडेकर कुटुंबीयांना दरमहा ७०० रुपये मदत देण्यास सुरुवात केली. गेली नऊ वर्षे वाघमोडे ही मदत न चुकता देत आहेत. दर महिन्याला निकिताचे चुलते वाघमोडे यांच्या लक्ष्मीपुरी येथील कार्यालयातून ही रक्कम घेऊन जात असल्याने बोडेकर कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला होता.

बोंद्रेनगर धनगर वसाहतीत पल्लवीच्या बळीनंतरही गुंडांची दहशत कायम असल्याने काही वयोवृद्धच घराच्या दारात बसून घडल्या प्रकाराची छुप्या आवाजात चर्चा करीत आहेत.

Web Title: Seven months ago, Gitanjali ... now Pallavi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.