जिल्ह्यासाठी सात नव्या रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:16+5:302021-05-16T04:22:16+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाकडे सात नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून याचा फायदा जिल्हा उप रुग्णालय, ग्रामीण ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाकडे सात नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून याचा फायदा जिल्हा उप रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली जात असून उपचाराच्या सर्व सुविधांसह आवश्यक ते मनुष्यबळ सर्व शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याअंतर्गतच रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपकरणांसह सज्ज असेलल्या रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय हातकणंगले, ग्रामीण रुग्णालय पारगाव, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, ग्रामीण रुग्णालय मलकापूर, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय नेसरी व ग्रामीण रुग्णालय गारगोटी अशा सात शासकीय रुग्णालयांसाठी या रुग्णवाहिका जिल्हा परिवहन विभागाकडे नोंदणी केल्यानंतर तातडीने सुपूर्द केल्या जातील, यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
--