मानसिंगसह सहाजणांवर गुन्हा
By Admin | Published: March 6, 2016 01:08 AM2016-03-06T01:08:27+5:302016-03-06T01:08:27+5:30
बनावट मृत्युपत्र : चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती लाटण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : बनावट मृत्युपत्राचा वापर करून मृत चंद्रकात ऊर्फ सुभाष श्रीपतराव बोंद्रे यांची स्थावर मालमत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांचा पुतण्या मानसिंग बोंद्रे याच्यासह सहाजणांवर शनिवारी न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संशयित आरोपी मानसिंग विजयराव बोंद्रे (वय ३१, रा. अंबाई टँक), सुनील पी. शिंदे (३५), टी. एस. पाडेकर (४० दोघे, रा. शनिवार पेठ), रूपेश रघुनाथ खांडेकर (२९, कसबा बीड, ता. करवीर), बाबासाहेब शंकरराव पाटील (३२, हरिओमनगर, रंकाळा), अजित व्ही. कदम (४०, रा. श्रीकृष्ण पार्क, फुलेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक चंद्रकांत बोंद्रे (२६, रा. अंबाई टँक) यांनी फिर्याद दिली आहे.
चंद्रकात बोंद्रे हे शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांत अग्रेसर होते. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ येथेही ते संचालक होते. त्यांच्या मालकीच्या अनेक मिळकती आहेत. त्यांतील काही त्यांच्या वाटणीस वडिलार्जीत हिश्श्याने आल्या आहेत व काही स्वकष्टार्र्जित आहेत. तसेच त्यांच्या नावावर विविध बँकांमध्ये ठेवी, बचत खात्यावर रक्कम, विमा कंपनीच्या रकमा, संस्थांचे शेअर्स आहेत. चंद्रकांत बोंद्रे यांच्या निधनानंतर त्यांचा पुतण्या मानसिंग बोंद्रे यांनी गावकामगार तलाठी, ग्रामपंचायत नागदेववाडी, सांगवडे, सिटी सर्व्हे करवीर, आदी ठिकाणी चंद्रकांत बोंद्रे यांच्या मालकीच्या मिळकत पत्रकी व सातबाराला नाव नोंद होण्यासाठी अर्ज दिला.
या प्रकाराची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक बोंद्रे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता मानसिंग बोंद्रे यांनी १६ आॅक्टोबर २०१५ रोजी तलाठी यांच्याकडे मृत बोंद्रे यांनी ७ एप्रिल २०१५ रोजी मृत्युपत्र करून ठेवल्याचे व त्यामध्ये सर्व मिळकती स्थावर व जंगम मालमत्ता मानसिंग बोंद्रे यांचे नावे केल्याचे नोंद असल्याचे अर्जामध्ये दिसून आले.
अभिषेक बोंद्रे यांनी, संशयित आरोपींनी मृत चंद्रकांत बोंद्रे यांच्या नावे बनावट मृत्युपत्र तयार करून संपत्ती बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. (प्रतिनिधी)