बोगस महिलेच्या नावे दस्त, मुलग्यासह सातजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:46 PM2019-04-27T17:46:15+5:302019-04-27T17:47:11+5:30
बालिंगा (ता. करवीर) येथील ३५६ चौ. मी. रिकाम्या जागेतील तीन प्लॉटचे बनावट महिलेच्या नावे दस्तऐवज करून, सात-बाराला नाव लावून विक्री केल्याप्रकरणी मुलग्यासह सातजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील ३५६ चौ. मी. रिकाम्या जागेतील तीन प्लॉटचे बनावट महिलेच्या नावे दस्तऐवज करून, सात-बाराला नाव लावून विक्री केल्याप्रकरणी मुलग्यासह सातजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संशयित आरोपी महादेव पांडुरंग पाटील (वय ३२, रा. साजणी, ता. हातकणंगले), भागोजी विठ्ठल बाऊदणे (३३, रा. बलराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), अज्ञात महिला, बाळासो हेरवाडे (रा. साजणी, ता. हातकणंगले), विठ्ठल भिवा यादव (रा. कसबा बीड, ता. करवीर, मिलिंद प्रकाश चौगुले (रा. नंदगाव, ता. करवीर), अतुल निवृत्ती माने (रा. गणेशवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, सोनाबाई विठ्ठल बाऊदणे (वय ४५, रा. बलराम कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) यांच्या मालकीची बालिंगा येथे रि. स. न. २०९ मध्ये ३५६ मधील तीन प्लॉट असलेली मिळकत आहे. या जागेची परस्पर विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा भागोजी बाऊदणेसह खरेदी करणारे महादेव पाटील यांनी संगनमत करून सोनाबाई बाऊदणे यांच्या नावे बनावट महिला उभी करून दस्त करून घेतला.
त्यानंतर सात-बारा उताऱ्याला नाव लावून विक्री केली. हा प्रकार सोनाबाई यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.