माजी उपमहापौर शमा मुल्ला, सलीम मुल्लासह सातजणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:31 AM2019-05-03T11:31:01+5:302019-05-03T11:32:29+5:30
मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजणांना मंगळवारी (दि. ३० एप्रिल) पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार त्यांना उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. सलीम यासीन मुल्ला, शमा सलीम मुल्ला, फिरोज यासीन मुल्ला, राजू यासीन मुल्ला, जावेद यासीन मुल्ला, सज्जाद ईसाक नाईकवडी, सुंदर दाभाडे अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
कोल्हापूर : मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजणांना मंगळवारी (दि. ३० एप्रिल) पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार त्यांना उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. सलीम यासीन मुल्ला, शमा सलीम मुल्ला, फिरोज यासीन मुल्ला, राजू यासीन मुल्ला, जावेद यासीन मुल्ला, सज्जाद ईसाक नाईकवडी, सुंदर दाभाडे अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
यादवनगर येथील सलीम मुल्ला याच्या मटका जुगार अड्ड्यावर दि. ८ एप्रिलला रात्री प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी शर्मा यांचा अंगरक्षक निरंजन पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळी यांना जमावाने धक्काबुक्की केली. अंगरक्षक पाटील याने संरक्षणार्थ काढलेले पिस्तूल काडतुसांसह संशयित नीलेश काळे याने पळवून नेले होते.
या प्रकरणी मटका बुकी मालक सलीम मुल्ला याच्यासह ४० जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत राजारामपुरी पोलिसांनी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठविला. त्याला त्यांनी ४८ तासांत मंजुरी दिली होती. त्यानुसार अटकेतील २७ जणांना यापूर्वी पुणे मोक्का न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
पोलिसांनी सलीम यासीन मुल्ला, माजी उपहामहापौर व विद्यमान नगरसेविका शमा सलीम मुल्ला, फिरोज यासीन मुल्ला, राजू यासीन मुल्ला, जावेद यासीन मुल्ला, सज्जाद ईसाक नाईकवडी, सुंदर दाभाडे यांचा चौकशीसाठी पुन्हा ताबा मिळावा, अशा मागणीचा अर्ज मोक्का न्यायालयाकडे सादर केला होता. त्या अर्जावर मंगळवारी निर्णय देताना या सातही जणांना न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.