अंबाबाईच्या श्रीपूजकांसह सातजणांना अटक
By admin | Published: April 22, 2016 12:38 AM2016-04-22T00:38:37+5:302016-04-22T00:54:15+5:30
जामिनावर मुक्तता : अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात तृप्ती देसाई यांना मारहाण प्रकरण
कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अंबाबाई देवी मंदिर गाभारा प्रवेशावेळी झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी श्रीपूजकांसह सातजणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सायंकाळी न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.अॅड. केदार वसंत मुनिश्वर (वय ३८ रा. २७५६ ए वॉर्ड, सासने बोळ, कोल्हापूर), श्रीश रामचंद्र मुनीश्वर (५६ रा. १४८९ बी वॉर्ड, स्वाती अपार्टमेंट, मंगळवार पेठ), आशिष ऊर्फ चैतन्य शेखर अष्टेकर (२६ रा.२७५४ ए वॉर्ड, सासने बोळ, महाद्वार रोड),
मयूर मुकुंद मुनिश्वर (४१ आर. के. नगर मूळ सोसायटी, कोल्हापूर) , निखील दीपक शानबाग (२५ कोमटे गल्ली, अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठ), किसन मुरलीधर कल्याणकर (५६ रा. १९२४ बी वॉर्ड, मंगळवार पेठ, न्यू इंग्लिश मेडियम शाळेशेजारी), जयकुमार रंगराव शिंदे (५९ रा. ६९० /२८ ताराराणी कॉलनी, संभाजीनगर मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
‘पोलिसांनी सांगितले की ‘अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाई यांच्यासह अन्य महिलांनी दि. १३ एप्रिलला प्रवेश आंदोलन केले. त्यावेळी गाभाऱ्यात जावून देवीचे दर्शन घेवून बाहेर पडत असताना देसाई यांना जोरदार मारहाण झाली होती. त्यांचे केस उपटले होते. शिवीगाळही करण्यात आली होती. मंदिरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण पाहून संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल मस्के यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस श्रीपूजकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार शिंदे व किसन कल्याणकर यांचा यांचा शोध घेत होते. परंतू गेली पाच दिवस ते पोलिसांना हुलकावणी देत होते.
या प्रकरणी गुरुवारी श्रीपूजकांसह सात जणांना अटक केली. यावेळी पोलिस ठाण्यात श्रीपूजकांबरोबर नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपचे सुरेश जरग व श्रीपूजकांचे वकील आले होते.
संशयितांवर कलमे...
भारतीय दंड विधान संहिता कलमानुसार या सर्वांवर १४३ व १४७ (गर्दी व मारामारी), ३३२ सरकारी नोकरास मारहाण, ३३६ व ३३७ मानवी जीवितास धोका, ३५३ शासकीय कामात अडथळा व ५०६ धमकी अशी कलमे आहेत. त्याचप्रमाणे देसाई मारहाण प्रकरणात अटक केलेल्या सातजणांसह अन्य ४५ जणांची नावे निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या सर्वांना दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एम. उन्हाळे यांच्या न्यायालयात पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी हजर केले. यावेळी उन्हाळे यांनी या सर्वांची जामिनावर मुक्तता केली. श्रीपूजकांच्यावतीने अॅड. अजय कुलकर्णी, अॅड. प्रवीण देशपांडे व अॅड. अभिषेक देसाई यांनी काम पाहिले.