लाचखोर लिपिकप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसह सातजण चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:51 AM2020-07-08T11:51:26+5:302020-07-08T11:52:20+5:30

कोल्हापूर : कागल-राधानगरी प्रांत कार्यालयातील लाचखोर लिपिक प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासाठी मंगळवारी प्रांताधिकारी राम हरी भोसले ...

Seven people, including state officials, are under investigation in the bribery clerk case | लाचखोर लिपिकप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसह सातजण चौकशीच्या फेऱ्यात

लाचखोर लिपिकप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसह सातजण चौकशीच्या फेऱ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देलाचखोर लिपिकप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसह सातजण चौकशीच्या फेऱ्यातदोन दिवस चौकशी सुरू राहणार : लाचखोर लिपिकास पोलीस कोठडी

कोल्हापूर : कागल-राधानगरी प्रांत कार्यालयातील लाचखोर लिपिक प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासाठी मंगळवारी प्रांताधिकारी राम हरी भोसले यांच्यासह तिघांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. या प्रकरणात कार्यालयातील सातजणांना चौकशीसाठी लेखी पत्र देऊन पाचारण करण्यात आले आहे. लाचखोर लिपिक सागर आनंदराव शिगावकर (वय ३६, रा. रविवार पेठ) याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

हमीदवाडा (ता. कागल) येथील तुकडेबंदी कायद्यानुसार जमीन नियमितीकरण करण्यासाठी एक लाख २० हजारांची लाच स्वीकारताना कागल-राधानगरी प्रांत कार्यालयातील लिपिक सागर शिगावकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. ६) दुपारी सापळा रचून रंगेहात पकडले.

तक्रारदारांकडून लाचेची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारल्यानंतर लिपिक शिगावकर हा कार्यालयातील स्वच्छतागृहात गेला. तेथे त्याने दरवाजा बंद करून आत पैसे मोजले. त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर तेथे थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला पैशांसह रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला कार्यालयात नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

तुकडेबंदी कायद्यानुसार फक्त अर्धा गुंठा जमीन नियमितीकरणासाठी एक लाख २० हजार इतक्या मोठ्या रकमेची लाच स्वीकारल्याप्रकरणात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सखोलपणे चौकशी करीत आहे. चौकशीसाठी प्रांताधिकारी भोसले यांच्यासह प्रांत कार्यालयातील सातजणांना लेखी पत्रे पाठवली आहेत.

मंगळवारी प्रांताधिकारी राम हरी भोसले यांच्यासह कार्यालयातील तिघांची सखोल चौकशी करण्यात आली. भोसले यांची चौकशी अपुरी राहिल्याने आज, बुधवारी पुन्हा त्यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील इतर सहकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी सांगितले.

लाचखोर लिपिकाचे निलंबन अटळ

लाचखोर लिपिक सागर शिगावकर यांचे निलंबन अटळ आहे. हे लाचखोर प्रकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गांभीर्याने घेतले आहे. शिगावकर याच्यावरील कारवाईचा लेखी अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांतच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
 

Web Title: Seven people, including state officials, are under investigation in the bribery clerk case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.