कोल्हापुरातील ग्रामसेवकासह सात जणांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 04:48 PM2021-12-22T16:48:25+5:302021-12-23T12:05:25+5:30

शेतजमिनीच्या वादातून कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी सहा जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

Seven persons including Kotoli Gram Sevak sentenced to 10 years forfeit in kolhapur | कोल्हापुरातील ग्रामसेवकासह सात जणांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापुरातील ग्रामसेवकासह सात जणांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

googlenewsNext

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-२) बी. डी. शेळके यांनी एका महिलेसह एकाच कुटुंबातील सात जणांना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता ॲड. मंजूषा बी. पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष होते.

शिक्षा झालेल्या आरोपींची नावे अशी : सुरेश संजय पाटील (वय ३३), भाऊ सागर पाटील (३६), वडील संजय केरबा पाटील (६१), अजित वसंत पाटील (२९), भाऊ विनायक पाटील (२६), वडील वसंत केरबा पाटील (५१), आई नकुशा उर्फ लक्ष्मी वसंत पाटील (४६ सर्व रा. कोतोली, ता. पन्हाळा).

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोतोली येथे शेतजमिनीच्या कारणांवरून वसंत व केरबा पाटील या भावांचा गावातीलच नीलेश पाटील यांच्याशी पूर्ववैमनस्यातनू वाद होता. दोन्हीही बाजूंनी यापूर्वी पन्हाळा पोलिसात तक्रारी दाखल आहेत. दि. १० मे २०१४ रोजी नीलेश हे घरी होते. त्यावेळी आशिष साखरे याने येऊन त्यांचे काका बाजीराव पाटील यांना मारहाण करत असल्याचे सांगितले.

नीलेश कुटुंबासह घटनास्थळी गेले. त्यावेळी हल्लेखोरांनी सहा जणांना लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी मारहाण केली. हल्ल्यात नीलेश जयसिंग पाटील, सुनीता जयसिंग पाटील, युवराज सर्जेराव पाटील, हौसाबाई सर्जेराव पाटील, बाजीराव श्रीपती पाटील, लक्ष्मी बाजीराव पाटील हे जखमी झाले. ठार मारण्यासाठी आरोपींनी हल्ला केल्याची तक्रार नीलेशनी पन्हाळा पोलिसांत दिली.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासले. फिर्यादी नीलेश, युवराज, लक्ष्मी पाटील तसेच सीपीआरसह खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरावा व सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने जादा कैद शिक्षा सुनावली. प्रकरणाचा तपास पो.नि. यशवंत गवारे यांनी केला. पैरवी अधिकारी श्याम बुचडे तसेच शहाजी पाटील यांची मदत लाभली.

हत्यार जप्ती पंच फितूर

खटल्यात हत्यार जप्ती पंच व आशिष साखरे हे फितूर झाले. तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

आरोपी गोंडोलीचे ग्रामसेवक

शिक्षा झालेल्यांपैकी सुरेश पाटील हे गोंडोली (ता. शाहुवाडी) येथे ग्रामसेवक म्हणून सेवेत आहेत.

Web Title: Seven persons including Kotoli Gram Sevak sentenced to 10 years forfeit in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.