Kolhapur: जयसिंगपुरात एका पतसंस्थेसह सात दुकानांना भीषण आग; ५० ते ७० लाखाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:19 PM2024-01-30T16:19:11+5:302024-01-30T16:20:16+5:30
रात्री दोन वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली
जयसिंगपूर : जयसिंगपुरातील मंगळवारची सकाळ एका भीषण आगीचे वृत्त घेवून उगवली. शहरातील एका पतसंस्थेसह सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीमध्ये सुमारे ५० ते ७० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री दोन वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येथील शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावरील शिवाजी चौक परिसरात सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. बुक स्टोअर, चहाचे दुकान, एक पतसंस्था, स्टेशनरी दुकानांमध्ये आगीने रौद्ररुप धारण केले. तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्नीशमन दलासह दत्त कारखान्याच्या अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली.
घटनेचे गांभीर्य ओळखून चहाच्या दुकानात असलेले गॅस सिलिंडर नागरीकांनी इतरत्र हलविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमध्ये धनवडे पतसंस्था, विराज स्टेशनरी, चौगुले बुकस्टॉल, एस.एम.एम.कलेक्शन, पाटील चहा आदी दुकानांचे सुमारे ५० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शेजारील दोन दुकानांचे देखील नुकसान झाले आहे.