एकाच कुटुंबातील सातजणांना विषबाधा
By admin | Published: March 29, 2015 12:27 AM2015-03-29T00:27:40+5:302015-03-29T00:27:40+5:30
इचलकरंजीतील घटना : शिळे अन्न खाल्ल्यामुळे उलट्या, जुलाबाचा त्रास
इचलकरंजी : येथील गुरूकन्नननगरमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमातील उरलेले शिळे अन्न खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील सातजणांना विषबाधा झाली. त्यांच्यावर येथील नगरपालिकेच्या आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, गुरूकन्नननगरमध्ये पाटील गल्लीत राहणाऱ्या म्हेत्रे यांच्या घरी शुक्रवारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेल्या बुंदी व अन्य प्रकारचे अन्न शनिवारी सकाळी म्हेत्रे कुटुंबीयांनी खाल्ले. कुटुंबातील पार्वती भीमाण्णा म्हेत्रे (वय ७०), कलावती भीमाण्णा म्हेत्रे (६०), कस्तुरी भीमाण्णा म्हेत्रे (३५), लक्ष्मी दुंडाप्पा म्हेत्रे (१८), सारिका दुंडाप्पा म्हेत्रे (१४), रूपाली दुंडाप्पा म्हेत्रे (१२)आणि रामचंद्र मल्लाप्पा व्हनवाड (७०) यांना शनिवारी दुपारपासून उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. या सर्वांना आयजीएम रुग्णालयामध्ये ताबडतोब हलविण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यामुळे सायंकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)