सात हजार पोलिसांचा ४८ तास खडा पहारा, तमिळनाडू, मध्यप्रदेश परिक्षेत्रातील स्पेशल फोर्स तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:37 PM2019-04-24T12:37:19+5:302019-04-24T12:41:35+5:30
लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.
लोकसभा निवडणूक बंदोबस्ताची तयारी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपासून केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कानोसा घेतला होता. या निवडणुकीत पोलीस प्रशासनाने अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन केले होते.
परराज्यांतून व परजिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ३०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. अवैध धंद्यांवर छापे टाकून त्या व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच सर्व पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द केल्या. ४० दिवस पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर उतरून बंदोबस्त करीत होते. प्रचारसभा, मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण होता.
निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूर परिक्षेत्रातील स्पेशल फोर्सचे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले होते. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. संवेदनशील मतदारसंघांत पोलिसांची जादा कुमक तैनात केल्याने कोणत्याही गैरप्रकारांना संधी मिळाली नाही.
इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात असल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. खासगी व शासकीय वाहनांतूनही पोलीस पेट्रोलिंग करीत होते. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसाठी चहा-नाष्टा, जेवणाची सोय स्वतंत्रपणे केली होती. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दोन महिने पोलिसांनी खूप मेहनत घेतली.