जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:29+5:302021-05-11T04:26:29+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने ...
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे सात हजार कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याने रात्री दहानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. तीन तास चर्चा झाली. विविध ठिकाणी फोन केले गेले. निर्णय झाला. वाहने आणि चालक बोलावण्यात आले. पुणे आणि रत्नागिरीला चाचण्यांसाठी स्वॅब पाठवूनच अधिकारी बैठकीतून उठले. कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्युदर कमी व्हावा यासाठी दिवसरात्र लढणाऱ्या या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची तडफ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
गेल्यावर्षीपासून सातत्याने कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कसोटी पाहणारे अनेक क्षण आले. गेल्यावर्षी तर कोरोनाचा कहर सुरू असताना दोनवेळा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर गेला होता. नंतरच्या काळात काही दिवस शांत गेल्यानंतर जानेवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि एप्रिलच्या मध्यापासून तर कहर सुरू केला.
रोज एक हजारवर रुग्ण आणि ५० च्या वर मृत्यू यामुळे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोठ्या संख्येने स्वॅबचे संकलन करण्यात आले. परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत रोज अडीच हजार स्वॅबची चाचणी करण्यात येते. एवढीच क्षमता असल्याने गेल्या तीन दिवसात सात हजार स्वॅब विनाचाचणी पडून होते.
रविवारी संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा समोर आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, शेंडा पार्क प्रयोगशाळेतील डॉ. विजय कुलकर्णी हे सर्वजण रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले.
या बैठकीला काही खासगी प्रयोगशाळांच्या चालकांनाही बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी सुरुवातीला चर्चा करण्यात आली. नंतर संजयसिंह चव्हाण यांनी पुण्यातील तर डॉ. योगेश साळे यांनी रत्नागिरीतील संबंधितांशी संपर्क साधला. अखेर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे १५००, बीजे मेडिकल कॉलेजकडे १५०० तर रत्नागिरी येथील प्रयोगशाळेकडे १ हजार स्वॅब पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट
गाड्या पाठवूनच अधिकारी घरी
निर्णय झाल्यानंतर या तीनही ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. रात्रीच या वाहनांवरील चालकांना उठवण्यात आले. त्यांना तातडीने बोलावून घेऊन पुणे येथे दोन ठिकाणी आणि रत्नागिरीला गाड्या गेल्यानंतरच अधिकारी बैठकीतून उठले. तातडीने या सर्वांनी मिळून निर्णय घेतल्याने प्रयोगशाळेवर येणारा संभाव्य ताण टळला आहे.
चौकट
नागरिकांच्या सहकार्याची गरज
आपण कधीही पॉझिटिव्ह येऊ शकतो हे माहिती असतानाही अधिकारी आणि कर्मचारी ज्या पध्दतीने कोरोना संकटकाळात काम करत आहेत. ते पाहता आता नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण प्रशासन मजबूतपणे काम करण्यामध्ये सर्वांचे हित आहे.