स्वच्छतेसाठी सातवेळा भारत भ्रमण
By admin | Published: November 16, 2015 12:37 AM2015-11-16T00:37:17+5:302015-11-16T00:37:31+5:30
भारताची ७वेळा सायकल सफर करुन प्रबोधन करण्याचा उपक्रम ओरिसा राज्यातील बह्मपूर येथील सीबाप्रसाद दास हा यंग सिनीअर्स करत आहे.
पाली : भारतातील सर्व राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, वनसंपदा वाढून पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेसाठी जनजागृती, एडस्वर प्रबोधन कार्यक्रम या चतुसूत्री सामाजिक उपक्रमासाठी संपूर्ण भारताची ७वेळा सायकल सफर करुन प्रबोधन करण्याचा उपक्रम ओरिसा राज्यातील बह्मपूर येथील सीबाप्रसाद दास हा यंग सिनीअर्स करत आहे.
आज सिबाप्रसाद दास हा सायकलने भ्रमंती करत गोवा येथे जात असताना पाली येथे थांबून त्याने सामाजिक संदेश, मार्गदर्शन व प्रबोधन केले. यावेळी त्याचे स्वागत उपसरपंच मंगेश पांचाळ, बीट शिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे, नामदेव हितवर्धक संघाचे अध्यक्ष योगेश हिरवे, डॉ. उमेश पेठकर, अॅड. सागर पाखरे यांनी करुन निवास व्यवस्थाही केली.
यावेळी दास याने सांगितले की, मी आतापर्यंत ७वेळा भारतातील सर्व राज्यांचा सायकलने सामाजिक प्रबोधनासाठी प्रवास केला असून, राज्यांमध्ये त्या ठिकाणच्या रोटरी, लायन्स क्लब, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, मार्गदर्शन याविषयीचे कार्यक्रम नि:शुल्क करत आहे. या चालू ८व्या देशव्यापी दौऱ्याची सुरुवात १५ आॅगस्ट २०१४ रोजी ओरिसामधून केली असून, तो १५ आॅगस्ट २०१६ रोजी ओरिसामध्येच समाप्त होणार आहे.
तसेच सध्या भारतामध्ये सीमावर्ती राज्यांमध्ये नक्षलवादाचे प्रमाण वाढत असून, ते रोखण्यासाठी शांतता प्रस्थापित होण्यासाठी शांतीचा संदेश देणे आवश्यक आहे. तसेच सध्या भारतातील सर्वच राज्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हासही चिंताजनक पातळीवर जाऊन पोहोचल्याने वनसंपदा संवर्धन व वृक्षलागवडसाठीही प्रबोधन करत आहे. तसेच देशामध्ये एचआयव्ही विषाणुंमुळे एडस्चे प्रमाणही वाढत आहे. त्याकरिता एडस्बाबत जनजागृती करत आहे, असे ते म्हणाले.
आपण स्वत: अविवाहित असून, सर्व आयुष्य हे समाज सेवेसाठीच व्यतित केले असून, ती करतच रहाणार आहे. तसेच प्रदूषण मुक्तीसाठी सायकलनेच न थकता सर्व प्रवास करत असतो. सायकलवरील बॅगेतच सर्व साहित्य, पंक्चर काढण्यासाठी एअर पंप व बॅटरी हे सर्व बरोबर घेऊनच हे कार्य सुरु ठेवले आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, लातूर, नगर, धुळे, कराड, चंद्रपूर, नागपूर येथेही कार्यक्रम केले आहेत. (वार्ताहर)
सिबाप्रसाद दास यांना या अनोख्या सामाजिक उपक्रमासाठी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही शुभसंदेश दिला असून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव ेदेशमुख व गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे ही त्यांच्या कार्यक्रमासाठी स्वत: आवर्जून उपस्थित राहत असत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठीही सहाय्य करत असत. चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनीही त्याचे स्वागत केले तसेच कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथेही त्यांचा मोठा कार्यक्रम पुढील दौऱ्यात आहे.