ऊस दराची कोंडी फुटली; शंभर रुपये द्यायला कारखाने तयार?
By विश्वास पाटील | Published: November 23, 2023 01:00 PM2023-11-23T13:00:30+5:302023-11-23T13:01:11+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता
विश्वास पाटील
कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला टनास १०० रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सात ते आठ कारखाने तयार झाले आहेत. त्यांनी रितसर तशी घोषणा करताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यामध्ये त्यासंदर्भात चर्चा सुरु आहे.
मागील हंगामातील ४०० रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला ३५०० रुपये एकरकमी पहिला हप्ता या मागणीसाठी संघटनेचे गेली २२ दिवस अत्यंत आक्रमक आंदोलन सुरु असल्याने साखर हंगाम ठप्प झाला आहे.
ऊसदरासंदर्भात मुंबईत बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर ४०० चा आग्रह सोडून देवून संघटनेने टनास किमान १०० रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतली आणि तीन पाऊले मागे घेतली.
एवढी रक्कम देण्याची कारखान्यांची तयारी आहे. ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळीही दर्शवली होती. परंतू सत्ताधारी काही नेते मागील हंगामातील काय द्यायचे नाही, चालू हंगामातील पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे कारखानदार दबकून होते परंतू आता त्यांनी शंभर रुपये देवून कोंडी फोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे एकदा काही कारखान्यांनी १०० रुपये जाहीर केल्यावर इतर कारखान्यांनाही ते देणे भाग पडते.