जिल्ह्यातील सात नगराध्यक्षपदे राखीव
By admin | Published: October 6, 2016 01:05 AM2016-10-06T01:05:43+5:302016-10-06T01:10:54+5:30
आरक्षण : गडहिंग्लज, कुरुंदवाड सर्वसाधारण
कोल्हापूर : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. गडहिंग्लज आणि कुरुंदवाड वगळता इतर सातही ठिकाणी हे पद राखीव झाले आहे. विशेष म्हणजे तीन नगरपालिकांचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. इचलकरंजीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मोठ्या संख्येने इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या आशेवर मात्र विरजण पडले आहे.
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने या सोडतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. गडहिंग्लज आणि कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले राहिल्याने तेथे सत्तेसाठी चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.
कागल आणि पन्हाळ्याचे इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी, तर जयसिंगपूरचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामुळे या तीन नगरपालिकांवर महिलांची सत्ता येणार आहे. मुरगूड, मलकापूर आणि पेठवडगावचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथेही चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. इचलकरंजी ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगरपालिका आहे. तेथील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे तेथे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या प्रस्थापितांंची संधी हुकणार आहे.