साखर मूल्यांकनात सातव्यांदा घट

By admin | Published: June 18, 2015 12:10 AM2015-06-18T00:10:13+5:302015-06-18T00:10:13+5:30

७० रुपयांची घट : कारखान्यांना २१०० रुपये साखर पोत्यावर उचल देण्याचा राज्य बँकेचा निर्णय

Seventh Dip in Sugar Assessment | साखर मूल्यांकनात सातव्यांदा घट

साखर मूल्यांकनात सातव्यांदा घट

Next

कोपार्डे : साखरेच्या दरात २००० प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाल्याने अवघ्या १५ दिवसांत कारखानदारांना प्रतिक्विंटल देण्यात येणाऱ्या उचलीत पुन्हा घट करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असणाऱ्या २२७५ साखर मूल्यांकनात अवघ्या सव्वा महिन्यात तीनवेळा घट करीत २१०० रुपये प्रतिक्विंटलवर आणल्याने साखर उद्योगावर आस्मानी आर्थिक संकटच आल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी साखर हंगामाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात
ऊसदराच्या संघर्षाशिवाय सुरुवात झाली. हंगाम सुरुवातीला शेतकरी संघटनांनी संघर्षापेक्षा कायद्याच्या लढाईला महत्त्व देत एफआरपीप्रमाणे कारखानदारांनी उसाचे दर जाहीर करावेत व कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू करावेत, असे जाहीर केले. तसा शासनदरबारीही तगादा लावला. त्यामुळे शासनानेही जे कारखाने एफआरपीप्रमाणे ऊसदर जाहीर करणार नाहीत, अशा कारखान्यांना नोटिसा बजावल्या. याचा परिणाम जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे
ऊसदर जाहीर केले. यावेळी साखरेचे दर ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल होते.
मात्र, यानंतर साखरेच्या दरात सुरू झालेल्या घसरणीला ब्रेक लागेना झाल्याने आताच्या एफआरपीप्रमाणे ऊसदर देण्याची रक्कम कशी उभा करायची, हा प्रश्न कारखानदारांपुढे आहे. कारखान्यांना पतपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँकेनेही आपले धोरण बदलले आहे. प्रत्येक तिमाहीला राज्य बँक साखरेच्या बाजारातील दराप्रमाणे कारखान्यांना प्रतिक्विंटल कर्जरूपात उचल देत होती. मात्र, सातत्याने साखरेच्या दरातील घसरण पाहून राज्य बँकेने गेल्या सव्वा महिन्यात तीनदा साखर मूल्यांकनात घट केली आहे. ५ मे रोजी प्रतिक्विंटल २२७५ रुपये देण्याचे राज्य बँकेने जाहीर केले, तर केवळ पंधरा दिवसांत यात बदल करीत २२ मे २०१५ रोजी प्रतिक्विंटल १०५ रुपये मूल्यांकनात घट करून ते २१७० रुपये केले, तर यानंतर अवघ्या दहा दिवसांत यात बदल करीत ७० रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन घटवून ५ जून २०१५ला ते २१०० रुपये केल्याने साखर कारखानदारांचे आभाळच फाटले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेले दोन हजार कोटी पॅकेज व आता केंद्राने जाहीर केलेले सहा हजार कोटींचे पॅकेज याबाबत कोणतेच नोटिफिकेशन काढले नसल्याने ते कधी व कसे मिळणार याकडे कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे, तर ज्या शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे ऊस बिले कारखानदारांकडे थकीत आहेत
त्यांचे लक्ष कधी बिले अदा
होणार याकडे लागून राहिले आहे. (वार्ताहर)

कारखानदारांसमोर यक्ष प्रश्न
राज्य बँकेने प्रतिक्विंटल २१०० रुपये मूल्यांकन जाहीर केले असले तरी याच्या केवळ ८५ टक्केच म्हणजे १७८५ रुपये बँक कारखान्यांना देते. या १७८५ मधूनही राज्य बँकेने पूर्वी दिलेल्या कर्जाचे हप्ते, प्रक्रिया खर्च, व्याज, पगार असे ५०० ते ७४० रुपये कपात करते. याचा विचार केल्यास उसाची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या हातात केवळ १०३५ रुपयेच शिल्लक राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची एफआरपी २४०० ने २६५० आह. याचा अर्थ अजून १४५० ते १६०० रुपये रक्कम प्रतिटन ऊसदर देण्यास कोठून उभी करायची, हा यक्ष प्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे.



साखरेच्या दरात घसरण
नोव्हेंबर, डिसेंबर २०१४ मध्ये २९०० ते ३००० प्रतिक्विंटल असणारे साखरेचे दर गेल्या सहा महिन्यांत ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल घसरले
आज एक्स फॅक्टरी साखरेचे दर २००० ते २१०० रुपये आहे. उत्पादन खर्चापेक्षा ७०० ते ८०० रुपये हा दर कमी आहे.

Web Title: Seventh Dip in Sugar Assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.