पश्चिम महाराष्ट्रात सत्तर टक्के कारखान्यांत स्थापनेपासून सत्तांतर नाही, कारखान्यांची नावे जाणून घ्या

By विश्वास पाटील | Published: April 27, 2023 12:53 PM2023-04-27T12:53:54+5:302023-04-27T12:55:10+5:30

एकदाही सत्तांतर न झालेले कारखाने

Seventy percent of the factories in West Maharashtra have not had a change of power since establishment | पश्चिम महाराष्ट्रात सत्तर टक्के कारखान्यांत स्थापनेपासून सत्तांतर नाही, कारखान्यांची नावे जाणून घ्या

पश्चिम महाराष्ट्रात सत्तर टक्के कारखान्यांत स्थापनेपासून सत्तांतर नाही, कारखान्यांची नावे जाणून घ्या

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारीत शेतकरी हिताचा कारभार असेल तर सहसा त्या कारखान्यात सत्तांतर होत नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ३३ पैकी २२ कारखान्यांमध्ये स्थापनेपासून आजअखेर एकदाही सत्तांतर झालेले नाही. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर त्याचे पुन्हा प्रत्यंतर आले. कागलमधील शाहूमध्ये संधी मिळत नाही म्हटल्यावर दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांनी नवीन कारखाना उभारला. तिथे संधी मिळत नाही म्हटल्यावर मुश्रीफ यांनी स्वत:चा कारखाना काढला, असेही घडले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण ५१ कारखाने आहेत. त्यातील ३३ सहकारी आहेत. त्यातील २२ मध्ये स्थापनेपासून एकदाही सत्तांतर झालेले नाही, याचा अर्थ सुमारे सत्तर टक्के कारखान्यात स्थापनेपासून एकाच घराण्याकडे, गटाकडे किंवा व्यक्तीकडे कारखान्याचे नेतृत्व आहे. कोल्हापुरात पंचगंगा कारखान्यात रत्नाप्पाण्णांना शामराव पाटील यड्रावकर व दिनकरराव मुद्राळे यांनी तगडे आव्हान दिले; परंतु, तरीही सत्तांतर झाले नाही. 

कुंभी-कासारी व भोगावतीत दोन वेळा सत्तांतर झाले. बिद्रीत १९८४ ला हिंदुराव पाटील यांच्याकडून माजी आमदार दिनकरराव जाधव व के.पी. पाटील यांच्याकडून कारखाना काढून घेतला. चंदगडच्या दौलत कारखान्यातही नरसिंगराव पाटील यांचा पराभव करून गोपाळराव पाटील यांनी सत्ता मिळवली.

सांगली जिल्ह्यात जत कारखान्यात विलासराव जगताप यांनी एकदा सत्तांतर केले. महाकालीच्या निवडणुकीत सत्तांतर झाले नाही; परंतु, पंडितराव जाधव यांना अध्यक्षपदावरून बाजूला करून नानासाहेब सगरे अध्यक्ष झाले.

सातारा जिल्ह्यात यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या दोन घराण्यात आलटून- पालटून सत्ता राहिली. कारखाना व कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची मालकी कुणाकडे हा त्यातील कळीचा मुद्दा राहिला. किसनवीरमध्येही दोन वेळा सत्तांतर झाले. जंग जंग पछाडूनही सह्याद्रीमध्ये सभासदांनी कधीच सत्तांतर होऊ दिले नाही.

एकदाही सत्तांतर न झालेले कारखाने

कोल्हापूर : वारणा, शिरोळ, शाहू, मंडलिक, शरद, डी.वाय. पाटील, जवाहर, राजाराम, उदयसिंहराव गायकवाड,
सांगली : वसंतदादा, राजारामबापू, विश्वासराव नाईक, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती कुंडल, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, महाकाली,
सातारा : बाळासाहेब देसाई पाटण, सह्याद्री कराड, अजिंक्यतारा सातारा, रयत.


ही सुद्धा आहेत महत्त्वाची कारणे...

  • दोन किंवा त्याहून जास्त टर्म सत्ता राहिल्यास सभासद वाढवले जातात. त्यातून पकड निर्माण होते.
  • सत्ताधारी गट आपल्याला हवा तसा बदल पोटनियमात करून घेतात.
  • विविध माध्यमातून सभासदांशी चांगला संपर्क असतो. त्याच्या मदतीला कारखानदारी येत असते. त्यातून सत्तारूढ आघाडीबद्दल आपलेपणा निर्माण होतो. तोच नंतर मतांत परावर्तित होतो.
  • चांगला दर, वेळेत बिले, सवलतीत साखर मिळावी, एवढीच सभासदांची माफक अपेक्षा असते.
  • ज्यांनी कारखाना उभारला त्या घराण्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनांत कायमच कृतज्ञतेची भावना असते. त्यामुळे कारखाना त्याच घराण्याकडे राहावा, असाही कल अनेक निवडणुकीत दिसला आहे.
     

बाप दाखव नाहीतर...

सध्या साखर कारखानदारीची बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशी स्थिती आहे. चांगला दर हंगामाच्या अगोदर देण्याचे जाहीर केले तरच शेतकरी ऊस घालतात. चांगला दर द्यायचा असेल तर अर्थकारणही तितकेच भक्कम लागते. शेतकरी संघटनांच्या चळवळीचा दबाव असल्याने भ्रष्ट कारभारास लगाम बसला आहे. त्यामुळे गैरव्यवस्थापन, सत्तारूढ गटातील लाथाळी, दुफळी आणि कारखाना नीट चालवता आला नाही तरच लोक बदलाचा निर्णय घेतात. एखाद्या हंगामात वाईट अनुभव आला तरी लगेच सत्तांतर होते असाही अनुभव नाही.

कारखान्याचे नेतृत्व दूरदृष्टीचे असेल, उसाची बिले वेळेत मिळत असतील, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत असतील तर सहकारी साखर कारखानदारीत सहसा सत्तांतर होत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. - विजय औताडे, साखर उद्योगाचे तज्ज्ञ

Web Title: Seventy percent of the factories in West Maharashtra have not had a change of power since establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.