लस टंचाईमुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:18+5:302021-06-27T04:16:18+5:30
शनिवारी सकाळीही नागरिकांनी आयसोलेशन रुग्णालयासह अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. या ठिकाणी लस संपली आहे असे सांगूनही नागरिक ...
शनिवारी सकाळीही नागरिकांनी आयसोलेशन रुग्णालयासह अनेक ठिकाणी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. या ठिकाणी लस संपली आहे असे सांगूनही नागरिक तेथून जात नव्हते. त्यामुळे या सर्वांची समजूत काढणे उपस्थितांसाठी अवघड बनले.
सीपीआरमधील लसीकरण केंद्रावर वशिल्याने लस दिली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. या ठिकाणचेच काही कर्मचारी आपले मित्र, नातेवाईक यांना येथे आणून लस देत असल्याचे सांगण्यात आले. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी याबाबत लक्ष घालून अधिकाधिक नागरिकांना लस कशी मिळेल याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
सीपीआरच्या पाठीमागील बाजूस लसीकरण केंद्र आहे. पीएसएम विभाग आणि नर्सिंग स्टाफमार्फत ही लसीकरण प्रक्रिया राबवण्यात येते. सुरुवातीला या ठिकाणी नागरिकांना प्राधान्य दिले जात होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून येथील कर्मचारी आपल्या नातेवाइकांसह मित्रपरिवाराला लसीकरणासाठी आणत असल्याने नाराजी वाढत आहे.
सध्या येथून २०० ते २५० नागरिकांना लसीकरणासाठी कुपन दिली जातात. यातील निम्मी कुपन नागरिकांना मिळतात. परंतु उरलेली कुपन ही संबंधितांना दिली जातात. तासन् तास रांगेत थांबून लस मिळत नसताना अशा पद्धतीने वशिल्याने लसीकरण नको अशी नागरिकांची मागणी आहे.
चौकट
बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण
एका डॉक्टरनी ज्या बँकेतून कर्ज घेतले होते, त्या बॅंकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोज आणून या ठिकाणी लसीकरण करून घेतल्याची चर्चा आजही सीपीआर परिसरात होताना दिसते.
चौकट
आतापर्यंत झालेले लसीकरण
विभाग पहिला डोस टक्के दुसरा डोस टक्के
आरोग्य कर्मचारी ११४ ६०
फ्रंटलाईन वर्कर २६४ ९०
१८ ते ४५ वयोगट १ ०
४५ वर्षांच्यावरील ५६ १४
एकूण २९ ८