पाचगाव उपनगरात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: December 5, 2015 12:14 AM2015-12-05T00:14:50+5:302015-12-05T00:25:29+5:30
कळंबा तलावात चार दिवसांचाच पाणीसाठा : महापालिकेने पाणीपुरवठा करण्याची महापौरांची सूचना
कोल्हापूर : शहराला लागून असलेल्या कळंबा तलावात सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून त्यानंतर काय करायचे, असा गंभीर प्रश्न पाचगाव उपनगरातील सुमारे पंधरा हजारांहून अधिक लोकवस्तीला पडला आहे. सध्या पंधरा दिवसांतून एकदा आणि तोही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाचगाव उपनगरात तातडीने पर्यायी पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
शहराच्या दक्षिण भागात असलेल्या पाचगांवला गावातील हौद व विहिरीतून, तर पाचगाव उपनगरातील २७ कॉलन्यांतील सुमारे १५ हजार लोकवस्तीला कळंबा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाचगाव ग्रामपंचायतीची क्षमता नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने महासभेच्या मान्यतेने पाचगाव उपनगराला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. सुमारे अडीच ते तीन हजार नळ कनेक्शन देण्यात आली आहेत. त्यासाठी स्वतंत्र जलशुद्धिकरण केंद्र सुरू करून कळंबा तलावातील पाणी घेण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला दोन वर्षांपासून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत होता; परंतु यंदा कळंबा तलावातीलच पाणीसाठा संपत आल्यामुळे आधी आठ दिवसांतून एकदा आणि आता तर पंधरा दिवसांतून एकदा तोही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या तलावात केवळ चार ते पाच दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले असल्याने त्यानंतर पाणीपुरवठाच बंद पडणार आहे.
पाचगाव उपनगरांतील पोवार कॉलनी, भोगम कॉलनी, द्रौपदीनगर, जाधव पार्क, वटवृक्ष कॉलनी, शिवनेरीनगर, शांतीनगरसह २७ कॉलन्यांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. परिसरातील नागरिकांनी महापौर अश्विनी रामाणे व माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांची भेट घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याची सूचना केली.
महापौरांनी सुचविले पर्याय
पाचगावातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी आर. के. नगर पाणी योजना, गिरगाव आणि महानगरपालिका पाणीपुरवठा योजना यांच्याकडून पाणी घेऊन ते पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे महापौर रामाणे यांनी सुचविले आहे. शहर हद्दवाढीत पाचगाव व उपनगरांचा समावेश आहे. त्यामुळे या भागाला आता पाणीपुरवठा केल्यास तेथील नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत होणार आहे, असे महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
वाशी नाका, कदम खाण येथील पाणीप्रश्न गंभीर
कोल्हापूर : रंकाळा तलावाला लागूनच असलेल्या जुना वाशीनाका, कदमखाण परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दररोज टॅँकरने किती दिवस पाणी देणार? असा सवाल या परिसरातील नागरिकांनी महापालिकेस विचारला आहे. शुक्रवारी नगरसेवक महेश सावंत यांनी या प्रश्नावर आयुक्त
पी. शिवशंकर यांची भेट घेऊन पाणी टंचाईकडे त्यांचे लक्ष वेधले.
आपटेनगर ते शिवाजी पेठ या मार्गावर टाकलेल्या मुख्य जलवाहिनीतून जुना वाशीनाका ते विजयनगर आणि राजकपूर पुतळा ते राजाराम चौक, कदमखाण या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून पाणीपुरवठा अतिशय सुरळीत आणि नियमितपणे होत होता; परंतु केल्या सहा-सात महिन्यांपासून नागरिकांना अत्यंत कमी प्रमाणात तसेच अनियमितपणे पाणी मिळत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून राजकपूर पुतळा ते टिंबर मार्केट कमान हा रस्ता नगरोत्थान योजनेतून करण्यात येत आहे. त्यावेळी नागरिकांसाठी नळजोडणीचे तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात आले. तथापि, ही कामे करताना कोठेतरी मुख्य जलवाहिनी फुटली असून त्यातून पाणी वाहून जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. असाच प्रकार राजकपूर पुतळा ते विजयनगर या मार्गावरील जलवाहिनीच्या बाबतीत घडला आहे. ही जलवाहिनीही फु टलेली आहे. त्यामुळे काही घरांत पाणी मिळते; पण त्यापुढे पाणी जात नाही. गेले सहा महिने नागरिक पाण्याविना त्रस्त आहेत.
याच प्रश्नावर नागरिकांनी महापालिका निवडणूक होण्यापूर्वी ‘रास्ता रोको’ केला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा प्रश्न आठ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले होते; परंतु पुढे कसलीच कार्यवाही झालेली नाही. पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे. आज नगरसेवक महेश सावंत यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या मार्गावरील जलवाहिन्या जुन्या असून त्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे त्या बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी खास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांनी आयुक्तांना विनंती केली.