ओथंबलेले शब्द..भारावलेले सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:48 AM2018-08-15T00:48:06+5:302018-08-15T00:48:10+5:30
कोल्हापूर : एखादा अधिकारी आपल्या कार्यपद्धती, आचरण, वक्तृत्वाच्या आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आंतरिक तळमळीच्या जोरावर किती आदर्शवत ठरू शकतो, याचा अनुभव मंगळवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहाने घेतला. निमित्त होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या निरोप समारंभाचे.
देशमुख ३१ जुलै रोजी स्वेच्छानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने निरोप देण्यात आला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
देशमुख यांच्या कार्याचा गौरव करताना अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, आज निरोप देताना शब्द सापडत नाहीत, अशी माझी अवस्था झाली आहे. अनेक ग्रामसेवक तुमच्या हाताखाली शिकल्याचा अभिमान व्यक्त करीत आहेत. त्यांना निवृत्तीनिमित्त निरोप देत असताना त्यांची कार्यसंस्कृती आपल्यामध्ये रुजविण्याची खरी गरज आहे.
भाजपचे गटनेते अरुण इंगवले म्हणाले, वाईटपणा घेण्याची सगळी कामे आम्ही देशमुख यांच्याकडे दिली; परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करून जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढविला. पाणी व स्वच्छता विभागांच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे म्हणाल्या, देशमुख यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारल्यानंतर त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी शासकीय अधिकारी झाले. कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यामध्ये देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वित्त व लेखा अधिकारी संजय राजमाने, डॉ. एस. एच. शिंदे, धनंजय जाधव यांनीही भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले मी अधिकारी आहे, यापेक्षा मी माणूस आहे, ही वृत्ती मी नेहमीच जागी ठेवली. घराघरांत विधायकतेचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी मला काम करायचं आहे. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. सभापती अंबरीश घाटगे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला सभापती वंदना मगदूम, सर्जेराव पाटील-पेरीडकर, विजय भोजे यांच्यासह विभागप्रमुख सुषमा देसाई, तुषार बुरुड, चंद्रकांत सूर्यवंशी, मारुती बसर्गेकर, सोमनाथ रसाळ, संजय अवघडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अंगारमळा पुस्तकामुळे निवृत्तीचा निश्चय
शेतकऱ्यांचे नेते आणि पहिल्यांदा शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारकांच्या भवितव्याविषयी सखोल मांडणी करणाºया शरद जोशी यांच्या ‘अंगारमळा’ या पुस्तकामुळे माझा स्वेच्छानिवृत्तीचा निश्चय पक्का झाल्याचे देशमुख म्हणाले. श्रीलंकेतील महालांना जर हनुमान भुलला असता तर सीतेची सोडवणूक झाली नसती. त्याचप्रमाणे शेतकºयांच्या पोरांनी अधिकारी व्हावे, शहरात जावे; परंतु तिथल्या वातावरण भुलू नये. आपल्या गावाकडे परत जाऊन तिथला उद्धार करावा, ही भूमिका शरद जोशी यांनी मांडली; म्हणूनच माझा हा निर्णय पक्का झाला.
आता तुम्ही ‘कमळ’ फुलवा!
देशमुख यांना रोखण्याचा अधिकार जर मला असता तर त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेतून मी जाऊच दिले नसते, असे सांगून यापुढच्या काळात आपले काम करीत असताना त्यांनी ‘कमळ’ फुलवावे, अशा शब्दांत अध्यक्षा महाडिक यांनी देशमुख यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले.