रंगछटांची बहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:12 AM2019-01-21T01:12:08+5:302019-01-21T01:12:14+5:30
कोल्हापूर : निसर्गरम्य अशा संस्थानकालीन टाऊन हॉल म्युझियम बागेत ‘रंगबहार’तर्फे रविवारी सकाळी आयोजित केलेल्या रंगसुरांची मैफिल संगीत अन् रंगांच्या ...
कोल्हापूर : निसर्गरम्य अशा संस्थानकालीन टाऊन हॉल म्युझियम बागेत ‘रंगबहार’तर्फे रविवारी सकाळी आयोजित केलेल्या रंगसुरांची मैफिल संगीत अन् रंगांच्या उधळणीत बहरली. चित्र, शिल्प, रांगोळी अशा विविध कलांची उधळण करीत कलाकारांनी दर्दी रसिकांना वेगळी अनुभूती दिली. यावेळी ज्येष्ठ चित्रकार विश्रांत पोवार यांना रंगबहार जीवन गौरव, तर युवा चित्रकार किशोर पुरेकर यांना युवा चंद्राश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर व विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते विश्रांत पोवार यांना जीवनगौरव, तर श्यामकांत जाधव कला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार युवा चंद्राश्री हा पुरस्कार किशोर पुरेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अजेय दळवी, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर, विलास बकरे, सर्जेराव निगवेकर, रियाज शेख, विजय टिपुगडे, सागर बगाडे, राहुल रेपे, संजीव संकपाळ, आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, रंगसुरांची मैफिल म्हणजे स्प्रिंग बोर्ड आहे. येथे संधी मिळालेला कलाकार नंतर अखिल विश्वात नावलौकिक मिळवितो. तसेच स्वत:बरोबर आपल्या मातृभूमीचे नाव मोठे करतात. या भूमीत राजर्षी शाहू महाराजांनी कलेला उत्तेजन दिले. कलाकारांना शिष्यवृत्ती दिली. राजाश्रयामुळे येथील कला बहरली. ही परंपरा आजही सुरू आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.
या मैफिलीत चित्रकार अशोक धर्माधिकारी, पुष्पक पांढरबळे, महेश सुतार (गडहिंग्लज), रमन लोहार (गडहिंग्लज), प्रा. विश्वास पाटील (इचलकरंजी) यांनी व्यक्तिचित्र रेखाटले, तर विवेक कवाळे यांनी सेल्फ पोर्टेट रंगविले. अमित मुसळे यांनी अचूक रेखांकनातून अर्कचित्र साकारले. मनोहारी निसर्गाला रंगरेषातून एस. निंबाळकर, मनोज दरेकर, अक्षय पाटील, अशोक बी. साळुंखे (पुणे) यांनी चित्र साकारले, तर कलाकारांच्या मनोभावना व्यक्त करणाऱ्या कलाकृती चेतन चौगले, सरिता फडके (गडहिंग्लज), आनंदा सावंत (कोल्हापूर), विजय उपाध्ये (कोल्हापूर), राखी अराडकर (सिंधुदुर्ग), विनायक पोतदार (पुणे) यांनी साकारल्या.
युवा शिल्पकार आशिष कुंभार, प्रशांत दिवटे, प्रफुल्ल कुंभार, योगेश माजगावकर, प्रफुल्ल कुंभार यांनी व्यक्तिशिल्प साकारले. रंगावलीकर प्रसाद राऊत यांनी रंगावलीतून मैफिलीला सलाम केला.