कोविडोत्तर रूग्णांसाठी सावली, रवी राईचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:38+5:302021-05-05T04:37:38+5:30
कोल्हापूर : कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेक रूग्णांना वेगवेगळे त्रास होतात. अशांसाठी येथील सावली केअर ...
कोल्हापूर : कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेक रूग्णांना वेगवेगळे त्रास होतात. अशांसाठी येथील सावली केअर सेंटर आणि रवी राई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळांनी घेतला आहे.
कोविडमधून बरे झालेल्या रूग्णांना सांधेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, श्वास घेण्यास त्रास, निद्रानाश, थकवा, छातीमध्ये वेदना, जीबी सिंड्रोम यासारखे त्रास जाणवतात. अशांना कोविड रूग्णालयात परत दाखल करून घेताना अडचणी येतात. तसेच भीतीमुळे अशा रूग्णांची काळजी घेणाऱ्या घरच्या मंडळींवरही मर्यादा येतात.
म्हणूनच सावली केअर सेंटर येथे स्पेशलाईज्ड कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. यामध्ये फिजिओथेरपी, समुपदेशन, सकस आहार या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच गरज भासल्यास ॲक्वाथेरपीही दिली जाणार आहे. ही सेवा निवासी आणि ओपीडी अशा दोन्ही पध्दतीने देण्यात येणार आहे. ‘सावली’च्या पीरवाडी आणि मोरेवाडी येथील दोन्ही सेंटरवर २० रूग्णांची सोय करण्यात येणार असून, ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘सावली’च्या धोरणाप्रमाणे आर्थिक कमकुवत वर्गातील ३० टक्के रूग्णांना सवलतीच्या दराने किंवा मोफत दाखल करून घेण्यात येणार आहे.