शाहूवाडीतून भारत पाटील विधानसभेला ठोकणार शड्डू
By admin | Published: May 24, 2014 12:57 AM2014-05-24T00:57:04+5:302014-05-24T01:08:57+5:30
संपर्कदौरा सुरू : स्वाभिमानी की शिवसेना हीच उत्सुकता; खासदार शेट्टींशी प्राथमिक चर्चा
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे नेते भारतअप्पा पाटील हे शाहूवाडी मतदारसंघातून विधानसभेला शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात व्यक्तिगत संपर्कदौराही सुरू केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेच्या उमेदवारीचा पर्याय त्यांच्यासमोर खुला आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याशी त्यांची यासंबंधी प्राथमिक चर्चा झाली असून, स्वाभिमानी संघटनेकडूनच त्यांनी रिंगणात उतरावे, अशा हालचाली आहेत. पाटील हे आमदार विनय कोरे यांचे कार्यकर्ते मानले जातात. श्री. कोरे हे सध्या याच मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. परंतु त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा अस्पष्ट आहे. ते नेमके काय करणार आहेत, हे समजत नाही. लोकसभेला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा दिला. त्यांच्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही खासदार शेट्टी विजयी झाले. त्यामुळे कोरे यांचे राजकारण बॅकफूटवर गेले आहे. भारत पाटील यांनी गेल्याच निवडणुकीत करवीर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, परंतु त्यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करण्यासाठी कोरे यांनी माजी आमदार पी. एन. पाटील यांना पाठिंबा दिला व त्यातून घडले उलटेच. त्यामुळे आता यावेळेला काही झाले तरी विधानसभा लढवायची, अशा विचारात भारत पाटील आहेत. सत्ता असो की नसो ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने लोकसंपर्कात आहेत. मध्यंतरी पन्हाळ््यावर वीर शिवा काशीद यांचे स्मारक उभारून त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते केले. त्याचवेळी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. अजित पवार यांच्याशीही त्यांचे संबंध जिव्हाळ््याचे आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे आणि आघाडींमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यात त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ते ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शेट्टी यांचे आंदोलन व भारत पाटील यांची विकासाची चळवळ अशी गट्टी जमल्यास त्यांना लोकांचे चांगले पाठबळ मिळू शकते. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी लोकसभेला शेट्टी यांना मदत न केल्याने यावेळेला शिवसेनेची उमेदवारी त्यांना मिळू नये, असे शेट्टी यांचे प्रयत्न राहतील. त्याऐवजी ही जागा ‘स्वाभिमानी’लाच मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे तसे झाल्यास संघटनेचा उमेदवार म्हणून भारत पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. पक्ष कोणताही असो, त्यांनी या वेळेला लढायचे पक्के केले असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)