शहरभान कॉलम -०५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:10+5:302021-02-11T04:25:10+5:30
‘शहर’ हे मानवाने निर्माण केलेले विश्व आहे. जगातील कित्येक शहरे आकर्षक आहेत तर कित्येक ओंगळवाणी ...
‘शहर’ हे मानवाने निर्माण केलेले विश्व आहे. जगातील कित्येक शहरे आकर्षक आहेत तर कित्येक ओंगळवाणी आहेत. अत्यंत गुंतागुंतीची आणि वैविध्यपूर्ण रचना कोणती असेल तर ती आहे शहरांची. शहर नियोजन आणि शहर विकास ही सतत घडणारी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. यासाठी सजग, कल्पक नागरी नेतृत्वाची शहरांना गरज आहे. जगात जी काही संपन्न आणि आकर्षक शहरे आहेत, ती स्थानिक नेतृत्वानेच आपल्या कल्पकतेच्या आणि बुद्धीच्या ताकदीने साकारली आहेत. नागरी नेतृत्वाची कल्पकता आणि बुद्धिमत्ता यांची ‘शहरे’ ही निदर्शक असतात. भारत अजूनही यापासून कोसो दूर आहे.
हे शहर माझं आहे. माझं शहर मला सांभाळायचे आहे. माझं शहर सोयीस्कर, आरोग्यसंपन्न, सौंदर्यपूर्ण झालं पाहिजे. माझ्या विधायक सहभागाची माझ्या शहराला अत्यंत गरज आहे. माझ्या शहरासाठी मला शक्य आहे ते योगदान देणं, हे माझं कर्तव्य आहे...! असं प्रत्येक नागरिकाला (आमदार, खासदारांसहित) ज्यावेळी वाटेल त्यावेळी ते आपल्या शहराबाबत सारासार विचार करू लागतील. शहर नियोजन, शहर नियोजनाची आव्हाने, गुंतागुंत समजून घेतील. सक्षम प्रतिनिधीबाबत अट्टाहास करतील. महापौर-महापौर या वायफळ खेळात मौल्यवान वेळ वाया घालवणार नाहीत. राजकीय, शासकीय व्यवस्थेत त्याचबरोबर कायद्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी प्रयत्न करतील.
‘होम सिटी’ ही एक छान संकल्पना आहे. माझं, आपलं मूळ गावं, आपल्या सगळ्यांचं एक व्यापक ‘घर’ या अर्थाने ही एक खूप छान संवेदनशील संकल्पना आहे. प्रत्येक नागरिक हा ‘शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापक कुटुंबाचा सदस्य असतो. प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराप्रति आपुलकी असते, जिव्हाळा असतो. प्रत्येक शहराला स्वतःची संस्कृती असते, ओळख असते. त्याला आपल्या शहराची ओळख, संस्कृती जपली जावे, असे अंतस्त वाटत असते. शहराच्या धोरणकर्त्यांनी, शहराप्रति असलेली नागरिकांची आपुलकी-जिव्हाळा, शहराची संस्कृती, ओळख, निष्ठा सांभाळायची असते, वृद्धिंगत करायची असते. खरंतर ही जबाबदारी कुटुंब प्रमुख या नात्याने ‘महापौरां’ची असते. महापौर तेवढे संवेदनशील आणि दर्जेदार असायला हवेत. आपल्याकडे याबाबत अपवाद वगळता भ्रमनिरास होईल, असाच अनुभव आहे.
आपल्याकडे महापौर नागरिकांच्या इच्छेचा नसतो. आमदारांच्या राजकीय सोयीचा असतो. कुटुंब प्रमुख या नात्याने जबाबदारीची जाणीव, क्षमता आणि शहरभान असलेले ‘महापौर’ सध्या तरी शहरांसाठी ‘दिवास्वप्न’ आहे. सध्या महापौरपद हे शहरात राजकीय इर्षा, तेढ, बडेजाव यात भर घालणारे आहे. शहरातील वातावरण बिघडवणारे आहे. दर अडीच-तीन महिन्यांनी निघणाऱ्या उन्मादी मिरवणुकांची सर्वसामन्य नागरिकांना उबग आहे. लोकांना खरोखर ज्यावेळी ‘शहरभान’ येईल, त्यावेळी या अनिष्ट प्रथा आपोआप बंद होतील.
शहर सांभाळणे. शहरांच्या वाढीचं नियोजन करणे, विकासाची धोरणे ठरवणे ही खूप गुंतागुंतीची संवेदनशील प्रक्रिया आहे. युरोप, अमेरिकेत व्यापक घर सांभाळणारी प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था विकसित झाली आहे. ‘शहरभान’ असलेला नागरी समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय आणि योग्य ताळमेळ आहे. यांच्या समन्वयातूनच युरोपिय शहरे आकर्षक बनली आहेत. समन्वयातूनच तेथे उच्च गुणवत्तेचे नागरी जीवन साकारले आहे. शहर नियोजन, शहर विकासाबाबत शिक्षण आणि संशोधनात युरोप आघाडीवर आहे. तिथे शालेय शिक्षणातच नागरी संस्कारांचे बाळकडू विध्यार्थ्यांना दिले जाते.
आपले नगसेवक किमान अधिकाऱ्यांशी सभ्यतेच्या भाषेत विचारांची, संकल्पनांची देवाणघेवाण करू शकले, असभ्य शिवराळ भाषा टाळू शकले, अरेरावी टाळू शकले, तरी शहरस्वास्थ्यात खूप फरक पडेल. पालिकेची कार्यसंस्कृती सुधारेल, उन्नतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल.
निवडणुका सत्ताधीश, सम्राट अथवा कमिशन एजंट निवडण्यासाठी नसतात. त्या प्रतिनिधी निवडण्यासाठी असतात. तर मग एवढा भरमसाठ खर्च हे लोक का करतात? याचा थोडा तरी विचार मतदारांनी करावा. माध्यमांनीही नगरसेवकांना, ‘तुम्ही सत्ताधीश नाही, प्रतिनिधी आहात...!’ याचे सतत ‘भान’ द्यावे. ‘शहरभान’ जपावे. त्यातूनच शहराच्या विकासाचा पाया घातला जाऊ शकतो. किमान त्याची सुरुवात आपण या निवडणुकीपासून करण्याचा प्रयत्न करुया...