शाहूभूमी ला ‘सारथी’चे अधिकारी, प्रथमच ३८० जणांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:32 AM2019-11-21T11:32:38+5:302019-11-21T11:35:50+5:30
या संस्थेत किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगेबाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत, इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविले जातात.
कोल्हापूर : पुणे येथील ‘सारथी’ या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी असे ३८० जणांचे पथक २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कोल्हापुरातील शाहूभूमीस भेट देणार आहे. या तीन दिवसांच्या अभ्यासदौºयात राजर्षी शाहू महाराजांशी संबंधित संस्था, इमारती, बांधकाम, पुराभिलेखागार विभाग, संग्रहालय, आदी ठिकाणी हे पथक भेट देणार आहे.
‘सारथी’ अर्थात छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अॅँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थींना राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेचा पथदर्शी प्रकल्प असलेल्या ‘तारादूत’मधील प्रशिक्षणार्थी असे ३८० जणांचे जम्बो पथक कोल्हापुरातील शाहूभूमीस भेट देणार आहे. यात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून ते त्यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक काम, संस्था, ज्या ठिकाणी ते राहिले ते स्थान, त्यांनी बांधलेले धरण, कर्तृत्व, आदींची सखोल माहिती हे पथक अभ्यासणार आहे.
या संस्थेत किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगेबाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत, इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविले जातात. त्याच्या प्रशिक्षणाकरिता देशभरातून प्रशिक्षणार्थी येथे येतात आणि प्रशिक्षण घेऊन देशभरात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य एक प्रकारे पुढे नेतात. त्यामुळे या ठिकाणी काम करणाºया अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना शाहू महाराजांविषयी अधिक व सखोल माहिती मिळावी. या उद्देशाने संस्थेने हा तीनदिवसीय अभ्यासदौरा बुधवारी (दि. २७) ते शुक्रवारी (दि. २९) नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला आहे.
या ठिकाणांना भेट
राजर्षींचे जन्मस्थान असलेल्या कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस, नवीन राजवाडा, संग्रहालय, कोल्हापूर पुराभिलेखागार विभाग, टाउन हॉल वस्तुसंग्रहालय, जुना राजवाडा, भवानी मंडप, नर्सरी बाग, पंचगंगा नदीघाट, समाधिस्थळ, मुस्लिम बोर्डिंग, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग कुस्ती मैदान, मोतीबाग तालीम, राधानगरी धरण, सोनतळी, पन्हाळगड, आदी ठिकाणी हे पथक भेट देऊन तेथील वस्तू, साहित्य, कागदपत्रे यांचा अभ्यास करणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने सुरू झालेल्या या संस्थेतील प्रत्येक घटकाला राजर्षी शाहू महाराजांबद्दल सखोल माहिती व्हावी. विशेषत: देशभरातून प्रशिक्षणासाठी येणाºया प्रशिक्षणार्थींना ते समजणे गरजेचे आहे. म्हणून हा अभ्यासदौरा आयोजित केला आहे.
- सपना महाडिक, प्रकल्प संचालक