शहीद भगतसिंग मंडळाची ‘सिस्टीम’ जप्त १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे : अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांसह सिस्टीममालकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:13 AM2018-09-12T01:13:44+5:302018-09-12T01:15:29+5:30
शहरातील महाद्वार रोडवर गणेश आगमन मिरवणुकीत सोमवारी नियमबाह्यपणे साउंड सिस्टीम लावणाऱ्या जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, साउंड सिस्टीम मालकासह मंडळांच्या १५ कार्यकर्त्यांवर
कोल्हापूर : शहरातील महाद्वार रोडवर गणेश आगमन मिरवणुकीत सोमवारी नियमबाह्यपणे साउंड सिस्टीम लावणाऱ्या जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, साउंड सिस्टीम मालकासह मंडळांच्या १५ कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. १०) रात्री गुन्हे दाखल केले. तसेच साउंड सिस्टीम जप्त केली. संबंधित मंडळावर कठोर कारवाईसाठी मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दोन दिवसांत सादर केले जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठका घेऊन, नियम डावलून साउंड सिस्टीम लावणाºया तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलीस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला तशी लेखी नोटीसही बजावली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची ध्वनिमर्यादा मंडळांना घालून दिली. तसेच साउंड सिस्टीम लावल्याने मानवी आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामांबद्दल प्रबोधनही केले होते; परंतु जुना बुधवार पेठ येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाने सोमवारी रात्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीत पोलिसांचे आदेश धुडकावून साउंड सिस्टीम लावून ध्वनिप्रदूषण केले. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या मार्गावर मिरवणूक रेंगाळून रहदारीस अडथळा झाला.
पोलिसांनी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना समज दिली असतानाही त्यांनी मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून नाचकाम केले. पोलिसांनी मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच ध्वनिक्षेपक मापन यंत्रांद्वारे आवाजाची मर्यादा तपासली. साउंड सिस्टीम जप्त करून मंडळांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. साउंड सिस्टीम मालक मुनीर ऊर्फ मुन्ना ऐनुद्दीन मुल्ला (वय ४५, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ) यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यांचे ध्वनियंत्रणेचे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
ध्वनिमुक्त गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा
गुन्हे दाखल झालेल्या मंडळांच्या पदाधिकाºयांना पारपत्र, शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये हजर होताना अडचणी निर्माण होऊन त्यांच्या भवितव्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे साउंड सिस्टीमचा हट्ट कोणी धरू नये, गणेशभक्तांनी ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.