सांगलीचा नितीन कोळी सीमेवर लढताना शहीद

By admin | Published: October 30, 2016 12:27 AM2016-10-30T00:27:29+5:302016-10-30T00:55:28+5:30

दुधगाववर शोककळा : दिवाळी साजरी न करण्याचा गावाचा निर्णय -पुण्यात आज पार्थिव

Shaheed fighting Sangli's Nitin Koli border | सांगलीचा नितीन कोळी सीमेवर लढताना शहीद

सांगलीचा नितीन कोळी सीमेवर लढताना शहीद

Next

सांगली/दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी (वय २८) जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील मच्छली सेक्टर येथे शुक्रवारी मध्यरात्री शहीद झाले. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच दुधगाववर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आणि दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
नितीन कोळी यांच्या पश्चात आई सुमन, वडील सुभाष, भाऊ उल्हास, पत्नी संपदा, मुले देवराज व युवराज असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव विमानाने रविवारी दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव या त्यांच्या जन्मगावी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. नितीन कोळी यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. २००८ मध्ये ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते.
शुक्रवारी ते सहकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळील मच्छली सेक्टरजवळ कर्तव्य बजावत होते. रात्री साडेनऊ वाजता पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी झालेल्या चकमकीत कोळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कोळी शहीद झाल्याचे वृत्त शनिवारी सकाळी गावात येऊन धडकले. त्यांच्या कुटुंबास बऱ्याच वेळानंतर माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शोकसभा घेऊन कोळी यांना आदरांजली वाहिली. गावात दिवाळी साजरी करायची नाही तसेच कोणीही फटाके फोडायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा आडमुठे, उपसरपंच संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, विश्वास कोळी, विलास आवटी उपस्थित होते. घरावर लावण्यात आलेले आकाशदिवे ग्रामस्थांनी स्वत:हून काढले. गावातील प्रमुख कर्मवीर चौकासह सर्वत्र दिवसभर शुकशुकाट होता. कोळी यांचे पार्थिव रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव येथे आणले जाणार आहे. (प्रतिनिधी)


कुटुंबाचा आधार हरपलाकुटुंबाचा आधार हरपला
शहीद जवान नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी म्हणाले की, लहानपणापासून नितीनची सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आमची घरची परिस्थिती बेताचीच होती, तरीही मी कष्ट करून नितीनला शिकविले. सैन्यात भरती होण्यासाठी त्याला आम्ही पाठबळ दिले. भरती होण्यासाठी त्यानेही खूप कष्ट केले. त्याच्या कष्टाला यश मिळाले. आठ वर्षांपूर्वी तो भरती झाला. तो शहीद झाल्याने कुटुंबाचा आधार गेला असून, फार मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही न भरून
येणारे आहे.
\पत्नीशी चार दिवसांपूर्वीच मोबाईलवर संपर्क
नितीन कोळी यांनी चार दिवसांपूर्वी पत्नी संपदा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून कुटुंबाची विचारपूस केली होती. ५ नोव्हेंबरला गावी सुटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण शुक्रवारी रात्री गोळीबारात ते शहीद झाले. पत्नीशी मोबाईलवर बोलल्यानंतर काही दिवसांतच ते शहीद झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. शनिवारी दुपारपर्यंत घरी वडील व भावालाच ते शहीद झाल्याचे माहीत होते.

मे महिन्यात सुटीला
नितीन कोळी मे महिन्यात गावाकडे सुटीला आले होते. नवरात्रौत्सवात ब्रह्मनाथ कल्चरल ग्रुपतर्फे गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ३२ जवान सुटीसाठी गावाकडे आले होते. या सर्वांचा सत्कार केला होता, पण या कार्यक्रमास कोळी यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी संपदा यांचा सत्कार करण्यात आला होता.
घराजवळ शुकशुकाट
दुधगावातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकालगत कोळी यांचे घर आहे. शनिवारी दुपारी घराजवळ शुकशुकाट होता. पत्नी व आईला ते शहीद झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे घराचे लोखंडी गेटही बंद केले होते. शेजारील चार-पाच ग्रामस्थ तेथे बसून होते. कोळी यांची मुले देवराज (वय चार) आणि युवराज (वय दोन) घरातच होती.

Web Title: Shaheed fighting Sangli's Nitin Koli border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.