बुलंद आवाजाचे शाहीर राजाराम जगताप यांचे वार्धक्याने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 06:39 PM2020-08-26T18:39:44+5:302020-08-26T18:41:04+5:30
बुलंद आवाजाने शाहीरी परंपरा कायम राखणारे इचलकरंजी येथील ज्येष्ठ शाहीर राजाराम सखाराम जगताप यांचे आज सकाळी वार्धक्याने निधन झाले.
कोल्हापूर/इचलकरंजी : बुलंद आवाजाने शाहीरी परंपरा कायम राखणारे इचलकरंजी येथील ज्येष्ठ शाहीर राजाराम सखाराम जगताप यांचे आज सकाळी वार्धक्याने निधन झाले.
शाहिरी क्षेत्रात कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करणारे म्हणून जगताप यांना ओळखले जाते. उत्कृष्ट वक्तृत्व आणि खडा आवाज याच्या जोरावर त्यांनी ५0 वर्षाहून अधिक काळ गाजवला.
४ मार्च १९३0 रोजी शाहीरांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटूंबात झाला. वडील सखाराम जगताप नामांकित पहिलवान होते. त्यांच्यासोबत त्यांचे चुलते गंगाराम जगताप शाहीरीचे कार्यक्रम करत. त्यांच्यामुळेच शाहीरी क्षेत्रात राजाराम जगताप यांचा प्रवेश झाला.
फक्त चौथीपर्र्यत शिक्षण झालेल्या राजाराम यांच्या काव्यप्रतिभा पाहून अनेकजण आश्चर्याने थक्क झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, कानपूर, अमृतसर अशा अनेक ठिकाणी त्यांनी शाहीरी कला सादर केली. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मोहन धारिया, वसंतदादा पाटील यांच्यासमोर त्यांनी आपली कला सादर केली.
कोल्हापूर जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका, रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या संस्थेकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ शाहीर कृष्णराव साबळे यांच्याहस्ते त्यांचा इचलकरंजीत सत्कार झाला होता. महाराष्ट्र सरकारतर्फे उत्कृष्ट शाहीर पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता.