समाजमनांवर गारूड घालणारा शाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:32+5:302021-03-23T04:26:32+5:30
तशी ‘ट’ ला ‘ट’ आणि ‘म’ ला ‘म’ लावून अल्पायुषी गीते लिहिणारे शेकडो शाहीर महाराष्ट्रात पाहायला मिळतात; पण ‘परिपूर्ण’ ...
तशी ‘ट’ ला ‘ट’ आणि ‘म’ ला ‘म’ लावून अल्पायुषी गीते लिहिणारे शेकडो शाहीर महाराष्ट्रात पाहायला मिळतात; पण ‘परिपूर्ण’ एवढ्यासाठीच म्हटलं की, लोकसाहित्याला आवश्यक असे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, संत वाङ्मयी, तत्त्वज्ञान आणि त्याशिवाय समाजशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरणशास्त्र, गायन, वादन, कायिक वाचिक साभिनयाच्यासहित प्रभावशाली सादरीकरणातून समाजमनावर जबरदस्त ‘गारूड’ घालणारा एक प्रतिभावंत कवी, शाहीर म्हणजे डॉ. शाहीर कुंतीनाथ करके.
काव्यशास्त्रातील गण, मात्रा, वृत्त, छंद, प्रास, अनुप्रास असे अनेक प्रकारांत त्यांनी विपुल लेखन लिहिले, म्हणूनच कवी यशवंत यांसारखे महान कवीदेखील ‘‘कुंतीनाथांची लेखणी ही बहुप्रसव आहे’’ असे म्हणायचे. पोवाडे, लावण्या, भारूड, सवाल जबाब, छेकानुपल्ली, कविता, मुक्तछंद, अभंग, आरत्या, पोथ्या, नाटक आणि कथाकथनसारखे अनेक प्रकार त्यांनी हाताळले.
प्रचंड वाचन, चिंतन, मनन, प्रज्ञावंतांचा सदैव सहवास, चर्चा, वाद, विवाद, विचारकलह यातून निर्माण झालेले साहित्य हे अगदी ग्रामीण शब्दापासून ते संस्कृतप्रचूर शब्दांच्या माध्यमातून कागदावर जणू दूध उतू गेल्यासारखे जाऊन शब्दांच्या माध्यमातून एका नव्या कलाकृतीचे रूप घेऊन उतरायचे. त्यांच्या शाहिरीबद्दल थोडक्यात बोलायचे म्हटले तर चौदा वर्षांपूर्वी मी आकाशवाणीवरून त्यांची मुलाखत घेतली तेव्हा मी उत्स्फूर्तपणे बोलून गेलो होतो. ‘‘शाहिरी ही ढाण्यावाघाची डरकाळी आहे, तर कधी कामधेनूची किंकाळी आहे, तर कधी शेतकऱ्यांच्या बांधावरनं सहकाऱ्याला दिलेली हाळी आहे, तर कधी जखमी हरिणीची किंकाळी आहे, तर कधी काळ्याकुट्ट मेघासारखी काळी आहे, तर कधी शब्दार्थानं भरलेली गोड गर्भित शहाळी आहे. कधी गरिबाची सुख-दु:खं टांगायची ती किंकाळी आहे, तर कधी रसरशीत रानमेव्याची रसानं भरलेली गोड करवंदाची जाळी आहे,’’ असं बरंच लिहिता येईल...पण शाहिरी ही मराठी रसिकाच्या कानात डुलणारी सुंदर अशी भिकबाळी आहे.. आणि अशा या शाहिरीला शब्द, सूर आणि ताल यांच्यासहित आपल्या पंखात ताकदीने पेलत या लोककलेच्या सरोवरात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दिमाखात डौलदारपणे विहार करणारा एक मनस्वी राजहंस आज अचानक कलासरोवर सोडून गेला...त्यांना विनम्र अभिवादन..
तीन भाषेवर प्रभुत्व
तीव्र स्मरणशक्ती, प्रचंड शब्दसंग्रह व सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. मिश्कील विनोदी तसेच काहीसे फटकळ व तापट असले तरी ते कुटुंबवत्सल होते. सदैव उत्साहाचा झरा असाच त्यांचा स्वभाव होता.
प्रतिभेची उंची..
बहुतेक शाहिरांनी गण भरपूर लिहिले आहेत; परंतु कुंतीनाथांच्या शारदेची तुलना होईल असे शारदास्तवन मराठी साहित्यात आढळत नाही यावरून त्यांच्या प्रतिभेची उंची लक्षात येते.
विवेकानंद शिक्षण संस्थेत त्यांनी आयुष्यभर अध्यापनाचे काम केले. त्यानंतर ते याच संस्थेच्या नियामक मंडळाचे आजीव सदस्य होते. बापूजी साळुंखे यांना ते गुरुस्थानी मानत असत. त्यांच्याबद्दल कमालीची कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात होती. प्राचार्य पी. बी. पाटील व डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशीही त्यांचा शालेय जीवनापासून गाढा स्नेह होता.
शिवशाहीर डॉ. राजू राऊत
शिवाजी पेठ, कोल्हापूर