‘शाहू वॉरियर्स’ची ‘राजाराम वॉरियर्स’वर मात-अटल चषक फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:57 AM2018-04-15T00:57:12+5:302018-04-15T00:57:12+5:30
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर राजर्षी शाहू वॉरियर्स संघाने छत्रपती राजाराम वॉरियर्सचा ३-२ असा पराभव केला. निमित्त होते, अटल चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीचे.
शाहू स्टेडियमवर शनिवारी ही मैत्रीपूर्ण लढत झाली. ‘शाहू’कडून आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उद्योजक चंद्रकांत जाधव, अभिनेता विकास पाटील, के.एस.ए. फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी यांचा; तर ‘राजाराम’कडून आमदार चंद्रदीप नरके, जि.प. सदस्य धैर्यशील माने, ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, पृथ्वीराज महाडिक, ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक संतोष गायकवाड, संभाजी जाधव यांनी चांगला खेळ केला. ‘शाहू’कडून अनिकेत जाधवच्या पासवर चंद्रकांत जाधव यांनी गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. महेश जाधव यांच्या पासवर धैर्यशील माने यांनी गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. अनिकेत जाधवने मैदानी गोल करीत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. राजाराम वॉरियर्सकडून नगरसेवक विजयसिंह खाडे यांनी मारलेल्या फ्री किकवर राजू साळोखे यांनी गोल नोंदवत सामना २-२ अशा स्थितीत आणला. ‘शाहू’कडून अनिकेतने मारलेला फटका गोलरक्षक ज्येष्ठ पत्रकार मनोज साळोखे यांनी अडविला. मात्र, त्यांना चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही. ही संधी साधत अनिकेतने केलेल्या गोलच्या जोरावर ‘शाहू’ने सामना ३-२ असा जिंकला.
टाळ्या-शिट्ट्यांची बरसात
या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये खेळापेक्षा लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी कसे खेळतात याचा ‘याची देही, याची डोळा’ अनुभव फुटबॉल रसिकांनी घेतला. त्यामुळे सामन्यादरम्यान प्रत्येक खेळाडूच्या हालचाली व चढायांवर हास्याचे फवारे व टाळ्या-शिट्ट्यांची बरसात झाली. विशेषत: अनिकेत जाधव, आमदार नरके, देवस्थान समितीचे महेश जाधव, आयुक्त डॉ. चौधरी, नगरसेवक संतोष गायकवाड, उद्योजक जाधव यांच्या खेळीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर अटल चषक स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी यांच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत आमदार चंद्रदीप नरके चेंडूला किक मारतानाचा एक क्षण.