जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांना शाहू पुरस्कार जाहीर, शाहू जयंतीदिनी होणार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:40 AM2022-06-15T11:40:04+5:302022-06-15T11:46:30+5:30
एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप
कोल्हापूर: नांदेड येथील रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ जनार्दन माधवराव वाघमारे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार आज, बुधवारी जाहीर झाला. एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या शाहू जयंतीदिनी २६ जूनला या पुरस्काराचे कोल्हापूर येथे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. तात्याराव लहाणे यांनाही यावेळी गतवर्षी जाहीर झालेल्या शाहू पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राजर्षी शाहू मेमोरियट ट्रस्टचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावार, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. ११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेले डॉ. वाघमारे हे लातूर जिल्ह्यातील कौसा ता. औसा येथील असून महाराष्ट्रात इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित, पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यास आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू आणि राज्यसभेचे खासदार अशा विविध पदांच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
२१ पुस्तकांचे लेखन
२१ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना लातूरच्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. त्यात त्यांनी बाजी मारली होती. ‘चिंतन एका नगराध्यक्षाचे’ असे त्यांचे आत्मचरित्रात्मक कांदबरीचेही लेखन केले असून. ‘शरद पवार अ प्रोफाईल इन लीडरशीप’ यासह त्यांनी चार इंग्रजी पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘द प्रॉब्लेम ऑफ आयडेंटिटि इन द पोस्ट वॉर अमेरिकन निग्रो नाॅव्हेल’ हा त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचा विषय होता.