आंदळकर यांना ‘शाहू’ पुरस्कार
By admin | Published: June 23, 2014 12:49 AM2014-06-23T00:49:08+5:302014-06-23T00:49:20+5:30
कुस्तीचा सन्मान : कोल्हापुरात गुरुवारी वितरण
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ यंदा हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांना जाहीर झाला. जिल्हाधिकारी व ट्रस्टचे अध्यक्ष राजाराम माने यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली.
जिल्हाधिकारी माने म्हणाले, कुस्ती क्षेत्रासाठी हिंदकेसरी आंदळकर यांनी सर्वस्व दिले आहे. पैलवान, कुशल मार्गदर्शक या पातळीवर त्यांनी अतुलनीय कार्य केले आहे. त्याची दखल घेत त्यांच्या आणि कुस्ती क्षेत्राच्या सन्मानार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्त गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे समारंभपूर्वक हिंदकेसरी आंदळकर यांना हा पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान केला जाईल. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, पुनवत (ता. बत्तीस शिराळा) येथे जन्मलेले हिंदकेसरी आंदळकर हे वयाच्या १५ व्या वर्षी कुस्तीसाठी कोल्हापुरात आले.
मोतीबाग तालमीत सराव करून त्यांनी कोल्हापूरचा नावलौकीक देश-विदेशांत केला. पैलवान, मार्गदर्शक, संघटक अशा विविध भूमिकेतून त्यांनी कुस्तीला बळ दिले.
कुस्ती एक मिशन समजून ते कार्यरत आहेत. कुस्तीच्या विकासासाठी ते जीवघेण्या आजारातून जिद्दीने उठले आहेत. त्यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला वेगळाच आनंद होत आहे. पत्रकार परिषदेस जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुरस्काराचे २९ वे वर्ष
समाजप्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, संगीत या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘शाहू’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. आतापर्यंत भाई माधवराव बागल, मेहरून्निसा दलवाई, डॉ. व्ही. शांताराम, शाहीर पिराजीराव सरनाईक, डॉ. बाबा आढाव, तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नानासाहेब गोरे, बाबा नेसरीकर, चंद्रकांत मांडरे, कुसुमाग्रज, डॉ. शंकरराव खरात, मायावती, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, रयत शिक्षण संस्था, जयंत नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, जयमाला शिलेदार, यशवंतराव मोहिते, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. आ. ह. साळुंखे, कॉ. गोविंद पानसरे, बाबूराव धारवाडे व रा. कृ. कणबरकर, प्राचार्य पी. बी. पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दुसरे मानकरी
कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेघनाथ नागेशकर यांना १९८६, तर राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे गुरू हनुमान यांना १९९१ मध्ये ‘शाहू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावर्षीचा पुरस्कार जाहीर झालेले हिंदकेसरी आंदळकर हे कुस्तीतील दुसरे, तर क्रीडाक्षेत्रातील तिसरे मानकरी ठरले आहेत.